पाच हजार नळजोडण्या बेकायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2017 12:54 AM2017-02-23T00:54:24+5:302017-02-23T00:54:24+5:30
इचलकरंजी नगरपालिका सभा : दंडात्मक कारवाईचा निर्णय; खास पथक नेमून शोधमोहीम राबविणार
इचलकरंजी : शहरात असलेल्या इमारतींच्या संख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या नळजोडण्यांचे प्रमाण अल्प आहे. नगरपालिका हद्दीत किमान पाच हजार नळ जोडण्या बेकायदेशीर असून, त्या शोधून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी खास पथक नेमून शोधमोहीम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा १६ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. मात्र, कोरोची (ता. हातकणंगले) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रचारसभा असल्यामुळे ही सभा तहकूब ठेवण्यात आली होती. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता नगराध्यक्ष अॅड. अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
सभेमध्ये शहरात असलेल्या अवैध घरगुती नळजोडण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विषय चर्चेस आला असताना मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी शहरात ५६ हजार मालमत्ता असून, ३५ हजार पाणीपुरवठा करणाऱ्या नळजोडण्या आहेत, असे स्पष्ट केले. याच विषयावर बोलताना जलअभियंता सुरेश कमळे म्हणाले, शहरामध्ये पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात २२ हजार इमारतींमध्ये नळ जोडण्या नसल्याचे आढळून आले आहे. वास्तविक पाहता इमारतींच्या तुलनेमध्ये आणखीन दहा हजारांहून अधिक नळजोडण्या असणे आवश्यक आहे. मात्र, यापैकी किमान पाच हजार नळ जोडण्या बेकायदेशीर असाव्यात. अशा नळजोडण्या शोधून घरगुती नळासाठी तीन वर्षांची पाणीपट्टी व पाच हजार रुपये दंड, तसेच औद्योगिक नळासाठी तीन वर्षांची पाणीपट्टी व २५ हजार रुपये दंड अशी तरतूद करावी. जलअभियंत्यांनी सूचविलेल्या प्रस्तावानुसार सभागृहाने दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत केला.
बेकायदेशीर नळ जोडण्यांबाबत बोलताना नगरसेवक बावचकर यांनी नगरपालिकेने वॉटर आॅडीट करून घ्यावे, हा मुद्दा आग्रहाने मांडला. ते म्हणाले, यापूर्वी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी काही अवैध नळ जोडण्या शोधून काढल्या होत्या. त्यांच्यावर कोणती कारवाई केली, असा प्रश्न विचारला. मात्र, त्यावर प्रशासनाला कोणताही खुलासा करता आला नाही. याच सभेमध्ये नगरपालिकेच्या मालकीची मंगल कार्यालये मक्ता पद्धतीने भाड्याने देणे व भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीमंत घोरपडे नाट्यगृह लग्न व अन्य कार्यांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मात्र सभेमध्ये फेटाळण्यात आला.
हागणदारीमुक्तीची घोषणा बहुमताने
इचलकरंजी शहर हागणदारीमुक्त झाले असल्याची घोषणा सत्तारूढ आघाडीने बहुमताने केली. याच घोषणेबाबत विरोधी कॉँग्रेस व शाहू आघाडीने जोरदार विरोध केला. तेव्हा सत्तारूढ आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. नगरसेवक शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, आदींनी हागणदारीमुक्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छतेचे वाभाडे काढले आणि शहरामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक उघड्यावर शौच करीत असल्याचे गुडमॉर्निंग पथकाला आढळून येत आहे. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. रसाळ व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी केलेल्या खुलाशानंतरसुद्धा विरोधक समाधानी झाले नाहीत. अखेर सत्तारूढ आघाडीने हागणदारीमुक्तीचा प्रस्ताव ३२ विरुद्ध २६ मतांनी मंजूर केला.