फलटणच्या पाच हजार महिला अंबाबाई चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:37 AM2017-09-28T00:37:12+5:302017-09-28T00:37:40+5:30
कोल्हापूर : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फलटण-माढा मतदारसंघातील व रयत क्रांती संघटनेच्या पाच हजार महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फलटण-माढा मतदारसंघातील व रयत क्रांती संघटनेच्या पाच हजार महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेतले. सदाभाऊंच्या संघटनेला यश मिळावे यासाठी त्यांनी अंबाबाईला साकडे घातले. मात्र, सायंकाळी अचानक पाऊस आल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाली.
बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मंत्री सदाभाऊ खोत यांच्या फलटण-माढा मतदारसंघातील पाच हजार महिला भाऊसिंगजी रोडवरून भवानी मंडपातून अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या. त्यावेळी अन्य महिला भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र, गेल्या तीन दिवसांप्रमाणे बुधवारीही सायंकाळी काही काळ पावसाने दमदार हजेरी लावली आणि या महिलांची तारांबळ उडाली. विशेषत: त्यांच्यासोबत असलेली लहान मुलेही भिजली. जागा मिळेल तिथे त्यांनी आडोशाचा आधार घेतला आणि गाभारा दर्शनाच्या रांगेत उभ्या राहिल्या. सातच्या दरम्यान या रांगा संपल्या. यावेळी त्यांनी सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेला यश मिळू दे, असे अंबाबाईला साकडे घातले आणि देवीची ज्योत घेऊन वाळव्याच्या मेळाव्यासाठी घाटी दरवाजा येथून मार्गस्थ झाल्या. अॅड. जिजामाता रणजित नाईक-निंबाळकर, मदनसा कुंभार, नगरसेविका लक्ष्मीताई नाईक-निंबाळकर, नगरसेविका खरात यांच्या नेतृत्वाखाली या महिला कोल्हापुरात आल्या होत्या.
दिवसभरात दोन लाख महिला भाविक
दरम्यान, बुधवारी दिवसभरात दोन लाख २९ हजार ८८९ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. गेले तीन दिवस पावसामुळे भाविकांची संख्या कमी झाल्याने बुधवारी भाविकांनी मंदिरात उपस्थिती लावली. आज, गुरुवारी जागर असल्याने उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे.