पाच हजार हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:49+5:302021-04-28T04:26:49+5:30

नंदकुमार ढेरे। चंदगड : जगाचा श्वास रोखून धरलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसत आहे. अनेक उद्योग बंद ...

Five thousand hotel employees starve | पाच हजार हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

पाच हजार हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

googlenewsNext

नंदकुमार ढेरे। चंदगड

: जगाचा श्वास रोखून धरलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसत आहे. अनेक उद्योग बंद पडले आहेत. पर्यटन व हॉटेल व्यवसायावर तर मोठे संकट आले आहे. या व्यवसायात चंदगड तालुक्यातील किमान ५ हजार कामगार अवलंबून आहेत. या ५ हजार कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. भाडेतत्त्वावर व कर्ज काढून चालवायला घेतलेले शंभराहून अधिक युवक कर्जबाजारी झाले आहेत.

तालुक्यातील विशेषत: पश्चिम भागातील युवक नोकरीच्या मागे न लागता उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, अलिबाग, नाशिक, पंढरपूर, ठाणे, औरंगाबाद, बेळगाव, गोवा व कर्नाटक राज्यात हॉटेलमध्ये कामाला आहेत. १० ते ४० हजार रुपये पगारावर चहाची टपरी ते पंचतारांकित हॉटेलात कामाला असणाऱ्या युवकांनी या व्यवसायात बऱ्यापैकी प्रगती केली आहे. शहरात व गावाकडे कर्जे काढून घरे घेतली आहेत; पण गेल्या १४ महिन्यांपासून हॉटेल व्यवसायच बंद झाल्याने गेल्या वर्षभरापासून ते कामगार कामावर नाहीत.

वर्षभर हॉटेल सुरू नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस फुगत आहे. या हॉटेल कामगार असल्याची नोंद सरकारी दरबारी नसल्याने सरकारची कोणतीही मदतीची शक्यता नाही.

कमावणारा माणूस बेकार झाला तर त्याची मानसिक स्थिती चांगली नसते. तालुक्यातील हजारो हात सध्या रिकामे आहेत. त्यांचे दरमहा येणारे कोट्यवधी रुपये बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेलमध्येच काम करता-करता भाडेतत्त्वावर व कर्ज काढून हॉटेल चालवायला घेतलेल्या कर्मचारीच हॉटेल मालक बनू पाहणाऱ्या चंदगड तालुक्यातील शंभराहून अधिक युवक कर्जबाजारी झाले आहेत.

--------------------------

हॉटेलमधील कामगारांसाठी महामंडळ स्थापन करा.

हॉटेलमधील काम करणारा कामगारवर्ग संघटित नाही त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसायावर संक्रांत कोसळली आहे. एवढा मोठा व्यवसाय बंद करताना त्यातील कामगारवर्गाला कर्जाचे ओझे घेऊन उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या कर्मचाऱ्यांसाठी लघु महामंडळ स्थापन करावे.

- शंकर ढोणुक्षे, केरवडे, ता.चंदगड, सध्या अलिबाग येथील हॉटेल व्यावसायिक

Web Title: Five thousand hotel employees starve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.