कर्नाटकातील पाच हजार मराठा बांधवांची मुंबईत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:33 PM2017-08-08T18:33:41+5:302017-08-08T18:33:45+5:30
कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.
प्रदीप शिंदे

मराठा क्रांती मूक मोर्चा ज्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये कर्नाटक सीमाप्रश्न सोडवावा, ही मागणी आहे. महाराष्ट्रातील या मराठा समाजाचा जर सीमालढ्यासाठी पाठिंबा मिळाला तर नक्कीच प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. या गोष्टींमुळे कर्नाटकातील सीमाभागातील लोकांमध्ये त्यामुळे एकप्रकारे चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळेच बेळगावात सकल मराठा समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. सुमारे दहा लाख नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आपली ताकद दाखवून दिली होती. आता मुंबईतील मोर्चातही आपली ताकद दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बेळगाव परिसरातील गावागावांत जनजागृती केली आहे. लहान-मोठ्या बैठका या भागात घेतल्या आहेत. सर्वजण बेळगाव येथील श्री रंगुबाई पॅलेस येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती प्रमुख कार्यालय येथून एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत मुंबईकडे मंगळवारी सायंकाळपर्यंत जात होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबईतील मोर्चाबाबत जागृतीचे काम सुरू आहे. आता मराठा मूकमोर्चाच्या रूपातून पुन्हा सीमाभागातील नागरिकांना ताकद मिळाली आहे. महाराष्ट्रातील सरकार जरी आमच्या पाठीशी नसले तरी येथील सकल मराठा बांधवांनी आपल्या प्रमुख मागणीमध्ये बेळगाव सीमाप्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला ताकद मिळाली आहे.
- दीपक दळवी,
अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती
गेली ६३ वर्षे सीमाप्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मराठा मूकमोर्चाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली जात आहे. त्यामुळे नक्कीच सीमाप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच बेळगांवसह आसपासच्या गावांतील हजारो मराठाबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत.
- गुणवंत पाटील,
प्रवक्ता, बेळगाव सकल मराठा समाज