पाच हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित

By admin | Published: July 23, 2016 12:39 AM2016-07-23T00:39:03+5:302016-07-23T00:55:16+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना : प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्याची शिक्षण उपसंचालकांकडे मागणी--मिशनअ‍ॅडमिशन

Five thousand students are denied admission from the eleventh entrance | पाच हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित

पाच हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित

Next

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊनही सुमारे चार हजार ९६० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत; त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. याचबरोबर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षण संस्थाचालक व प्राचार्य वेठीस धरत असून, त्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोपही शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक तथा अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी यांच्यासमोर केला. यावर दि. ३० जुलैला याप्रश्नी बैठक घेऊ, असे आश्वासन गोंधळी यांनी दिले.
यंदा अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये एकूण १४ हजार ३६० अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यांपैकी सुमारे ९४०० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. त्यामुळे चार हजार ९६० विद्यार्थी आजअखेर प्रवेशापासून दूर राहिले आहेत. या गोष्टी होऊ नयेत म्हणून या प्रवेश प्रक्रियेसाठी म्युच्युअल ट्रान्स्फर ही पद्धत सुरू करावी, असे निवेदन ४ जून २०१५ रोजी या कार्यालयाला देण्यात आले होते. त्यावेळी ‘यावर पुढील वर्षी विचार करू,’ असे प्रशासनाने सांगितले होते. पण यंदा या प्रवेश प्रक्रियेवेळी म्युच्युअल ट्रान्स्फर ही पद्धत राबविण्यात आली नाही. दरम्यान, सध्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये कॉलेजने याद्या दिल्यानंतर प्रवेश झाले की नाहीत, तसेच कॉलेज प्रशासनाने पाच टक्के जागा भरल्या की २० ते २५ टक्के जागा भरल्या, हे तपासण्याची कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये डोनेशन घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात; म्हणून ही प्रवेश प्रक्रिया परिपूर्ण नाही. तसेच यात अनेक दोष आहेत.
जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहराध्यक्ष मंदार पाटील, अमर ढेरे, प्रसाद ढवळे, संतोष खटावकर, अमोल कुंभार, रोहित शिंदे, राजन हल्लोळी, महेश साळोखे, आदींचा सहभाग होता.


डी. एड्. प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
कोल्हापूर : न्यायालयाच्या स्थगितीमुळे रखडलेली प्राथमिक शिक्षण पदविका अर्थात डी. एड्. प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी (दि. २१)पासून सुरुवात झाली आहे. यंदापासून ही प्रक्रिया आॅनलाईन केंद्रीय पद्धतीने होत आहे. अर्ज भरण्यासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. जिल्ह्यात ३६ डी. एड्. अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था आहेत. त्यापैकी सहा संस्था अनुदानित आहे. उर्वरित संस्था विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. या एकूण १७३६ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे.
‘आयटीआय’ संस्थानिहाय निवड यादीची उद्या प्रसिद्धी
कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीमधील प्रवेश जागांसाठी विकल्प भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी संपली. उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता संस्थानिहाय निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. वेल्डर, फिटर, टर्नर अशा विविध ३१ अभ्यासक्रमांच्या एकूण १३१९ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
‘तंत्रनिकेतन’च्या तिसऱ्या फेरीच्या जागांची आज प्रसिद्धी
कोल्हापूर : शासकीय व खासगी तंत्रनिकेतन प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठीच्या जागांची घोषणा आज, शनिवारी होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीतील प्रवेशास सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी गुरुवारी (दि. २१) पूर्ण झाली.

Web Title: Five thousand students are denied admission from the eleventh entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.