पहाटे पाचलाच मैदान तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:28 AM2019-01-07T00:28:27+5:302019-01-07T00:28:32+5:30

कोल्हापूर : भल्या पहाटे थंडीची चादर दूर करत हजारो कोल्हापूरकरांनी रविवारी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभाग घेतला. संपूर्ण पोलीस मैदानच सळसळत्या ...

Five times in the morning tumult | पहाटे पाचलाच मैदान तुडुंब

पहाटे पाचलाच मैदान तुडुंब

Next

कोल्हापूर : भल्या पहाटे थंडीची चादर दूर करत हजारो कोल्हापूरकरांनी रविवारी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभाग घेतला. संपूर्ण पोलीस मैदानच सळसळत्या उत्साहाचे नवऊर्जा केंद्र बनल्याचे चित्र यावेळी दिसून आले. स्पर्धा सुरू होतानाचा उत्साह... शर्यत पूर्ण करण्याची ईर्षा..फिनिश पॉर्इंटवर आल्यानंतरचे समाधान आणि नंतर केवळ जल्लोष अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरील वैविध्यपूर्ण भावनांचे दर्शनच यावेळी मॅरेथॉनपटूंच्या चेहऱ्यावर दिसत होते.
गेल्यावर्षीच्या पहिल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’चा अनुभव पाठीशी असल्यामुळे नोंदणी केलेल्या सर्वांनाच वेळेत मॅरेथॉन सुरू होणार असल्याची खात्री होती. अशातच रविवारी पहाटे थंडीही कमी होती; त्यामुळे सकाळी पाच वाजल्यापासून पोलीस मैदानाकडे जाणाºया सर्व रस्त्यांवर मॅरेथॉनपटूंची लगबग दिसत होती.
नेमके पार्किंग कुठे असणार आहे, रस्ते कुठले बंद आहेत, याची ‘लोकमत’मधून आधीच माहिती दिली गेल्याने सर्वजण अगदी वेळेवर पोलीस मैदानावर हजर झाले. सहा वाजून गेल्यानंतर सर्वांनाच वेध लागले, ते पहिल्या २१ किलोमीटरची दौड कधी सुरू होते याचे.
पोलीस मैदानावर झगझगत्या प्रकाशामध्ये वेगवेगळे स्टॉल्स उभारले होते. महामॅरेथॉन सुरू करण्यासाठी आणि बक्षीस वितरणासाठी दोन वेगवेगळे आकर्षक स्टेज उभारण्यात आले होते. तोपर्यंत मान्यवरांच्या कक्षांमध्ये खासदार संभाजीराजे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे, आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विश्वास नांगरे-पाटील, अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, समित कदम यांचे
आगमन झाले. ‘लोकमत’ वृत्तसमूहाचे व्हाईस प्रेसिडेंट बी. बी. चांडक, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले. २१ किलोमीटर धावणाºया खेळांडूविषयी सर्वांनाच औत्सुक्य असल्याचे दिसून आले. २१ किलोमीटरची घोषणा झाल्यानंतर उर्वरित सर्वचजण या रनर्सना चिअरअप करण्यासाठी एकत्र झाले. यानंतर काही मिनिटांच्या अंतराने १०, ५ आणि ३ किलोमीटरच्या मॅरेथॉनसाठी सहभागींना सोडण्यात आले. आरोग्यसेवेपासून अल्पोपहारापर्यंत, पिण्याच्या पाण्यापासून ते मेडल वितरणापर्यंत सर्वत्र नेमके नियोजन असल्याने धावपटूंनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.
चंद्रदीप नरके यांचा साधेपणा
आमदार चंद्रदीप नरके हे रोज सव्वासहा किलोमीटर धावतात. त्यांनी गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षी १० किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. परत आल्यानंतर एकीकडे सर्वत्र जल्लोष सुरू असताना त्यांनी एका बाजूला थांबून स्ट्रेचिंग केले. वॉकिंग करून झाल्यावर युवकांच्या आग्रहास्तव त्यांनी गाण्यावर नृत्याचा ठेकाही धरला. नरके यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव जयराज आणि त्यांच्या चालकानेही मॅरेथॉन पूर्ण केली.
संभाजीराजे, नांगरे-पाटील
यांची युवावर्गामध्ये क्रेझ
खासदार संभाजीराजे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची युवावर्गामध्ये क्रेझ असल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. दोघांसोबत सेल्फी काढण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती.
हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे
यांच्यात अर्धा तास चर्चा
कधी नव्हे ते भल्या सकाळी ‘लोकमत महामॅरेथॉन’मुळे अनेक राजकीय नेते एकमेकांना भेटले. कागलहून आमदार हसन मुश्रीफ आले. त्याचवेळी इचलकरंजीहून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचेही आगमन झाले. मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर दोघांनीही मान्यवरांच्या कक्षामध्ये चहा घेत अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा केली. अर्थात गप्पांचा विषय राजकीयच होता.
विशाल, वैष्णवीच्या सुरांवर थिरकले पाय : या संपूर्ण महामॅरेथॉनच्या दरम्यान कोल्हापूरच्या विशाल सुतार आणि वैष्णवी गोरड यांच्या हिंदी, मराठी गीतांनी पोलीस मैदानावर वेगळीच वातावरण निर्मिती केली. त्यांच्या अनेक गीतांवर तरुणाईने ठेका धरला. अगदी वयस्कर महिला आणि पुरुषांनीही ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने आपले नृत्यकौशल्य दाखवून दिले.

Web Title: Five times in the morning tumult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.