संभाजीनगरात महापालिकेच्या टेम्पो खाली सापडून पाच वर्षांची चिमुरडी ठार; संतप्त जमावाकडून दगडफेक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 03:16 PM2022-01-09T15:16:56+5:302022-01-09T15:18:58+5:30
Kolhapur : अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून महापालिकच्या टेम्पोचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होते. घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
- तानाजी पोवार
कोल्हापूर : रस्त्याकडेला थांबलेल्या गॅस एजन्सीच्या टेम्पोचा दरवाजा चालकाने अचानक उघडल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीच्या हँडेलला टच झाले, त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली. पाठोपाठ पाठीमागून येणाऱ्या भरधाव महापालिकेच्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वडिलांसोबत निघालेली पाच वर्षाची चिमुरडी टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. अन्वी विकास कांबळे ( रा. रायगड कॉलनी. मूळ रा. वारे वसाहत, संभाजीनगर) असे मृत झालेल्या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. अपघातात तिचे वडील विकास दिलीप कांबळे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून महापालिकच्या टेम्पोचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अन्वी कांबळे व तिचे वडील विकास कांबळे हे दोघेजण दुचाकीवरून वारे वसाहत मधील मूळच्या घराकडून रायगड काँलनीतील घराकडे जात होते. दरम्यान, संभाजीनगरजवळ एका गॅस एजन्सी च्या दारात उभारलेल्या गॅस सिलेंडर भरलेल्या टेम्पोचा दरवाजा चालकाने अचानक उघडला. याच वेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीच्या हँडेलला दरवाजाचा धक्का लागल्याने दुचाकी खाली पडली. दरम्यान पाठीमागून आलेल्या महापालिकेच्या टेम्पोची दुचाकीला जोराची धडक लागली. दुचाकीवरील दोघेही टेंम्पोखाली सापडले. अन्वीच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर विकास कांबळे हे जखमी झाले. दरम्यान नागरिकांनी गर्दी जमा केली. टेम्पो एका बाजूने उचलून त्याखाली सापडलेल्या अन्वी व विकास यांना बाहेर काढले. नागरिकांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अन्वीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या टेम्पो वर तुफान दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. अपघाताची घटना समजताच नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता.