आठवडी बाजारासाठी शहरात जागा निश्चित

By Admin | Published: August 26, 2016 12:49 AM2016-08-26T00:49:18+5:302016-08-26T01:12:10+5:30

महापालिकेतील बैठकीत निर्णय : संत सावता माळी थेट शेतीमाल विक्री योजनेअंतर्गत बाजार

Fix the city seats for the week market | आठवडी बाजारासाठी शहरात जागा निश्चित

आठवडी बाजारासाठी शहरात जागा निश्चित

googlenewsNext

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या संत सावता माळी थेट शेतीमाल विक्री योजनेअंतर्गत शेतकरी आठवडी बाजार भरविण्यासाठी कोल्हापूर शहरातील काही जागा निश्चित करण्यात आल्या. महापालिकेच्या गुरुवारी ताराराणी सभागृहात पदाधिकारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.
बैठकीच्या प्रारंभी आयुक्त पी. शिवशंकर यांनी राज्य शासनाने नुकतीच संत सावता माळी थेट शेतीमाल विक्री योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर शहरात शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यासाठी महापालिकेकडून राज्य कृषी पणन मंडळास जागा उपलब्ध करून द्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. आठवडी बाजारातील प्रत्येक स्टॉलसाठी महापालिकेच्यावतीने पन्नास रुपये साफसफाई शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आठवडी बाजाराकरिता विविध जागांबाबत चर्चा होऊन महापालिकेच्या मालकीच्या उपलब्ध मार्केटपैकी सानेगुरुजी मार्केट, फुलेवाडी मार्केट, शिंगोशी मार्केट, पंत बाळेकुंद्री मार्केट, कसबा बावडा मार्केट या ठिकाणी तसेच सासने ग्राऊंड, मंडलिक पार्क राजारामपुरी १३ वी गल्ली, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील रस्त्याकडील जागा, खत कारखाना संभाजीनगर, गंजीवली खणीशेजारी मंगेशकरनगर, हुतात्मा गार्डनसमोरील मोकळी जागा याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात आठवडी बाजाराकरिता जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
विरोधी पक्षनेता संभाजी जाधव यांनी ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरणार आहे त्या ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याकरिता वाहतूक शाखेचे पोलिस नेमण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे सुचविले. गटनेता शारंगधर देशमुख यांनी संभाजीनगरजवळील तपोवन परिसर, कळंबा रोड या उपनगरांतील ठिकाणांचा विचार आठवडी बाजाराकरिता व्हावा ज्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सोय होईल तसेच मालविक्रीची ठिकाणे जवळ पडतील. रस्त्याकडेला कुठेही बसू देऊ नये. जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.
गटनेता विजय सूर्यवंशी यांनी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महापालिकेच्या क्षेत्रामधील आरक्षित बाजाराच्या जागांमध्ये ही केंद्रे करून देण्यासाठी आतापासून डीपीआर तयार करा, जेणेकरून पुढच्या टप्प्यात त्याचा फायदा होईल. देण्यात येणाऱ्या जागेमध्ये प्रत्येकाच्या जागेचा आकार निश्चित करून त्याठिकाणी वेगळी पार्किंग व्यवस्था ठरवून द्या, अशी सूचना केली.
यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, सभागृह नेता प्रवीण केसरकर, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, छाया पोवार, राजसिंह शेळके, गटनेता सत्यजित कदम, नियाज खान, नगरसेवक विजयसिंह खाडे, मोहन सालपे, नगरसेविका उमा इंगळे, उपायुक्त विजय खोराटे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले आदी उपस्थित होते.

Web Title: Fix the city seats for the week market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.