मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते कोल्हापूरात ध्वजारोहण
By भारत चव्हाण | Published: January 26, 2023 12:06 PM2023-01-26T12:06:59+5:302023-01-26T12:18:00+5:30
छत्रपती शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन कोल्हापुरात पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ शासकीय अधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त लष्करी अधिकारी यांच्यासह विविध थरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. सकाळी सव्वा नऊ वाजता पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी परेड निरीक्षण केल्यानंतर पोलिस, होमगार्ड, एनसीसी विद्यार्थी, अग्निशमन दलाचे जवान, व्हाईट आर्मी, स्काऊटगाईड विद्यार्थी, वन विभाग, समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शानदार संचलन करुन पालकमंत्र्यांना सलामी दिली.
या साेहळ्यात पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते माजी सैनिकांना सैन्य सेवेत असताना युध्दजन्य परिस्थितीत अपंगत्व आलेल्या सुभेदार राजाराम कांबळे व हवलदार संभाजी पाटील यांना ताम्रपटाचे वितरण अंतरिक सुरक्षा पदक मिळालेल्या पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, राष्ट्रपती शौर्य पदक पटकावणारे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस हवालदार नामदेव यादव, लघु उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालेले अमर जाधव, वसंतलाल दलाल, विनय खोबरे, सुवर्णा हराळे, भगवान पवार यांना गौरविण्यात आले. याच वेळी समाज कल्याण, पन्हाळा तहसील कार्यालय, राधानगरी तहसील कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे पुरस्कारांचे तसेच गुणवंत विद्यार्थाच्या गुणगौरवही पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. सर्वात शेवटी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर विद्यार्थ्यांचे झांजपथकाचे तसेच महाराष्ट्र हायस्कूलच्या बाराशे विद्यार्थ्यांचे शानदार सामुदायिक कवायतीचा कार्यक्रम झाला.