स्थानिक आघाड्यांचाच सरपंचपदावर झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 10:30 AM2021-02-10T10:30:52+5:302021-02-10T10:38:43+5:30
sarpanch Grampanchyat Kolhpaur- पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच निवडणुकीतही स्थानिक आघाड्यांनीच पुन्हा एकदा आपणच गावचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी निवड झालेल्या १६७ पैकी ७३ ठिकाणी स्थानिक आघाडीचा सरपंच गावचा कारभारी झाला आहे.
कोल्हापूर : पक्षापेक्षा गट तटावर निवडणूक लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निकालात स्थानिक आघाड्यांचाच बोलबाला राहिला असताना आता सहा तालुक्यांतील सरपंच निवडणुकीतही स्थानिक आघाड्यांनीच पुन्हा एकदा आपणच गावचे किंग असल्याचे दाखवून दिले आहे. मंगळवारी निवड झालेल्या १६७ पैकी ७३ ठिकाणी स्थानिक आघाडीचा सरपंच गावचा कारभारी झाला आहे.
४० सरपंचपदासह राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना १९ सरपंचपदासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजप १०, काँग्रेस ९, महाविकास आघाडी ८, ताराराणी, जनसुराज्य प्रत्येकी ३, शेकाप, जनता दल प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल राहिले.
जिल्ह्यात स्थगिती आलेले सहा तालुके वगळून मंगळवारी कागल, राधानगरी, चंदगड, आजरा, हातकणंगले, गगनबावडा या तालुक्यातील १७३ गावांच्या सरपंच निवडी होणार होत्या, पण सरपंचपदासाठी आरक्षित उमेदवार नसल्याने ६ गावे वगळून उर्वरीत १६७ गावांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.
अपेक्षेप्रमाणे गगनबावड्यात पालकमंत्री सतेज पाटील एकहाती ८ पैकी ५ ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या. कागलमध्येही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही ५३ पैकी सर्वाधिक ३१ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवले. हातकणंगलेत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले तर आमदार प्रकाश आवाडे व आमदार विनय कोरे यांनी देखील प्रत्येकी तीन गावे आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. आजऱ्यात पक्षापेक्षा २६ पैकी २६ ग्रामपंचायती गटांमध्येच विभागल्या गेल्या. राधानगरीतही ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीचा गड मजबूत केला. चंदगडमध्ये आमदार राजेश पाटील गटासह ४० जागा स्थानिक आघाडीकडेच राहिल्या.
पक्षीय बलाबल
- स्थानिक आघाडी : ७३
- राष्ट्रवादी काँग्रेस : ४०
- शिवसेना : १९
- भाजप : १०
- काँग्रेस : ०९
- महाविकास आघाडी : ०८
- ताराराणी : ०३
- जनसुराज्य : ०३
- शेकाप : ०१
- जनता दल : ०१
स्थानिक आघाड्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसचा सरपंच झाला असला तरी स्वबळावर काँग्रेसला गगनबावडा व राधानगरीत चांगले यश मिळाले आहे.
सर्वाधिक गावे आपल्याच पक्षाकडे दावा सर्वांचाच
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सर्वाधिक गावे आपल्याच पक्षाकडे दावा सर्वांनीच केला होता. भाजपनेही तसा दावा केला होता, पण प्रत्यक्षात सरपंच निवडी झाल्यानंतर भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यांना कागलमध्ये सर्वाधिक ७, गगनबावडा, १, चंदगड १ आणि हातकणंगले १ अशा १० गावांवरच समाधान मानावे लागले आहे.
राष्ट्रवादीला बाजूला ठेवून बाजी मारली
राधानगरी तालुक्यातील पनोरी या गावात सरपंच काँग्रेसचा आणि उपसरंपच भाजपचा असे झाले आहे. अशीच परिस्थिती आजरा तालुक्यातील मुमेवाडी येथे झाली. तेथे काँग्रेस, भाजप व शिवसेनेने एकत्र येत राष्ट्रवादीला बाजूला ठेवून पाच विरुद्ध चार अशी बाजी मारली.
बुरंबाळी ग्रामपंचायत-सरपंच निवडीलाच वाद
राधानगरीतील बुरंबाळी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, पण तेथे बिनसल्याने सरपंच निवडीलाच वाद होऊन सर्व पक्ष बाजूला राहून सरपंच व उपसरंपच हे दोन्ही पदे एकट्या काँग्रेसकडे राहिली.
- कागल : ५३ गावांपैकी ३१ गावात मुश्रीफ, संजय घाटगे गट ९, समरजित घाटगे गट ७
- राधानगरी : १९ पैकी ९ ए.वाय.पाटील, कॉंग्रेस ४, आबीटकर १, शेकाप १, जनता दल १, स्थानिक आघाडी ३
- चंदगड : ४१ पैकी ४० राष्ट्रवादी,शिवसेना, कॉंग्रेस यांची स्थानिक आघाडी, भाजप १
- आजरा: २६ पैकी २६ स्थानिक आघाडी
- हातकणंगले : २० पैकी महाविकास आघाडी ८, सर्वपक्षीय ३, शिवसेना ३, जनसुराज्य ३, ताराराणी आघाडी ३, भाजप ०१
- गगनबावडा : ८ पैकी सतेज पाटील गट ५, भाजप १, स्थानिक आघाडी १, पी.जी. शिंदे गट १