खानापूर बाजार समितीवर एकीकरणचा झेंडा
By Admin | Published: January 15, 2017 01:08 AM2017-01-15T01:08:54+5:302017-01-15T01:08:54+5:30
बेळगाव समितीत बरोबरी : निवडणुकीत मराठी भाषिकांचे वर्चस्व कायम
बेळगाव : बेळगाव आणि खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर मराठी भाषिकांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकरण समितीने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवत वर्चस्व राखले. बेळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सात मराठी भाषिकांनी विजय मिळविला. काकती आणि उचगाव मतदारसंघात मात्र काँग्रेसमधील मराठी भाषिकांनी विजय मिळविल्याने मागील तुलनेत एकीकरण समितीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शनिवारी खानापूर, बेळगावमध्ये झालेल्या मतमोजणीत कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती. सरदार हायस्कूलमध्ये मतमोजणी सकाळी नऊपासून सुरू होती. खानापूर येथील निवडणुकीत आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर एपीएमसीवर एकीकरण समितीचा झेंडा फडकला आहे. एकूण १३ पैकी १० जागा समितीने, तर भाजपने २ आणि काँग्रेसला १ जागा मिळाली. खानापूरमधील दहा एकीकरण समितीच्या विजयी सदस्यांनी शिवस्मारकात विजयोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
बेळगाव तालुक्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन जागा कमी झाल्या. तालुक्यात मराठी भाषिक उमेदवारांची संख्या जास्त असली तरी एकूण १२ पैकी ५ जागांवर समितीला विजय मिळविता आला, तर ५ ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झालेत. दोन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. बेळगाव शहर मतदारसंघात एकीकरण समितीच्या तानाजी पाटील यांनी केवळ ८ मतांच्या अंतराच्या फरकाने विजय मिळविला. बेळगावातील एकूण ११ सदस्यांच्या निवडणुकीत एकीकरण समिती ५ , काँग्रेस ५, तर एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती बेळगाव निकाल
व्यापारी संघ - महेश कुगजी (समिती)
बेळगुंदी - निंगप्पा जाधव (समिती)
बेळगाव - तानाजी पाटील (समिती)
येळ्ळूर - महेश जुवेकर (समिती)
उचगाव - युवराज कदम (काँग्रेस)
काकती : आनंद पाटील (काँग्रेस)
ब कुडची : सुधीर गड्डे (काँग्रेस )
पिरनवाडी : आर. के. पाटील (समिती)
सांबरा : फकिरा नाईक (भाजप)
देसुर : संजू मदार (काँग्रेस)
बागेवाडी : आक्काताई जत्ती (भाजप)
हुदली : खान् गौडर (काँग्रेस)