ध्वजस्तंभाचे १ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
By admin | Published: April 8, 2017 12:52 AM2017-04-08T00:52:42+5:302017-04-08T00:52:42+5:30
एम. बी. तांबडे; पोलिस निधीसाठी अक्षयकुमार, मराठी अभिनेत्रींची उपस्थिती
कोल्हापूर : येथील पोलिस मुख्यालय परिसरातील पोलिस उद्यानात देशातील दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत आहे. दि. १ मे रोजी ध्वजस्तंभाचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याच दिवशी पोलिस मुख्यालय मैदानावर पोलिस कल्याण निधीसाठी ‘मराठी तारका’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यासाठी सिनेस्टार अक्षयकुमार, दहा मराठी सिनेअभिनेत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व नांगरे-पाटील यांच्या पुढाकारातून स्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. उद्यान व ध्वजस्तंभासाठी सुमारे एक कोटी निधीची तरतूद केली आहे. या ध्वजस्तंभाचे अनावरण व उद्यानाचे उद्घाटन दि. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
त्याच दिवशी पोलिस कवायत मैदानावर पोलिस कल्याण निधी संंकलनासाठी ‘मराठी तारका’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यातून पोलिस कल्याण निधी जमा केला जाणार असून पाचशे ते एक हजार रुपये तिकीट दर आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सिनेस्टार अक्षयकुमार, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, आदी दहा अभिनेत्री, गायक, उपस्थित राहणार आहेत.
निधी संकलित करताना सक्ती नको, अवैध व्यावसायिकांना तिकीट विक्री करायची नाही, अशा सूचना केल्याचे तांबडे यांनी सांगितले. यावेळी गृहपोलिस उपअधीक्षक सतीश माने, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, अरविंद चौधरी उपस्थित होते.
असा असेल स्तंभ
उद्यानातील प्रशस्त जागेत हा ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. शहराच्या कोणत्याही भागातून या स्तंभावर फडकणारा तिरंगा दिसेल. उद्यानात व्यासपीठाच्या मागील बाजूस तिरंगी ध्वजाच्या रंगांचे महत्त्व विशद करणारी भित्तिचित्रे (म्युरल्स) उभारण्यात येणार असून, त्यावरून पाणी सोडण्यात येणार आहे. तिथे वाहतूक प्रशिक्षण, शस्त्रे व पोशाख प्रदर्शन, आदींचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
५५ लाखांचा निधी
कोल्हापूर पोलिस दलाकडे एक रुपयाही पोलिस निधी नाही. पुणे ग्रामीण पोलिस दलाकडे पाच कोटी, तर शेजारील सांगली पोलिसांकडे एक कोटीचा पोलिस कल्याण निधी शिल्लक आहे. कोल्हापुरात होणाऱ्या ‘मराठी तारका’ कार्यक्रमाचा अंदाज घेत विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी पुणे ग्रामीणकडून ५५ लाखांचा निधी कोल्हापूर पोलिस दलाकडे वर्ग केला आहे.