गडकरींच्या स्वागताला इच्छुकांची झुंबड

By admin | Published: September 14, 2014 12:32 AM2014-09-14T00:32:12+5:302014-09-14T00:35:37+5:30

‘भाजप’ कार्यकर्ते बाजूलाच : आघाडीच्या बड्या शिलेदारांची उपस्थिती; जिल्ह्याच्या राजकारणातील बदलाची नांदी

The flag of wishing for Gadkari's welcome | गडकरींच्या स्वागताला इच्छुकांची झुंबड

गडकरींच्या स्वागताला इच्छुकांची झुंबड

Next

कोल्हापूर : भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांची भाऊगर्दी उसळली. भाजपच्या कार्यकर्त्यांना मागे सारुन हीच झुंबड त्यांचे स्वागत करण्यास पुढे होती. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर वातावरणात कसा बदल होतो, याचा प्रत्यय या भाऊगर्दीमुळे दिसून आला.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या ठिकाणी खासदार राजू शेट्टी, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, संभाजीराव पवार, सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे, सुजित मिणचेकर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, राजाराम शिपुगडे, पुंडलिक जाधव, के. एस. चौगुले, हिंदुराव शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, माजी आमदार संजय घाटगे, विश्वविजय खानविलकर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मंत्री गडकरी यांचे विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, आमदार चंद्रकांतदादा पाटील होते. या ठिकाणी गडकरी यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी इच्छुकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी उसळली. पोलिसांनी सर्वांनाच आत सोडल्याने या ठिकाणी गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत गर्दीतूनच गडकरींनी मार्गक्रमण केले. यानंतर वेटिंग रूममध्ये जाऊन प्रमुख मान्यवरांची भेटही त्यांनी घेतली; परंतु स्वागत करणाऱ्यांची गर्दी पाहता पदाधिकाऱ्यांनी त्यांना या ठिकाणी अधिक वेळ थांबू दिले नाही. विमानतळाबाहेरही कार्यकर्त्यांची स्वागतासाठी गर्दी झाली होती. गडकरींनी उपस्थितांकडून पुष्पगुच्छ स्वीकारत व अभिवादन करतच गाडीत प्रवेश केला. काही काळ गाडीत उभे राहूनही त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारले. यानंतर ते महालक्ष्मी दर्शनाला गेले.
इच्छुकांची गर्दी
विधानसभेसाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक, ‘गोकुळ’चे संचालक अरुणकुमार डोंगळे, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सत्वशील माने, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, प्रा. बी. जी. मांगले, राजू माने, उद्योगपती चंद्रकांत जाधव, माणिक पाटील-चुयेकर, प्रताप कोंडेकर, बाळासाहेब नवणे, आदी नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.
‘तुम्ही उठू नका...’
विमानतळावरील वेटिंग रूममध्ये राजू शेट्टी, संजय पाटील, सुरेश खाडे, संभाजीराव पवार, सुजित मिणचेकर, सदाभाऊ खोत, संजयबाबा घाटगे, विश्वविजय खानविलकर, अमल महाडिक, सत्वशील माने आदी गडकरींच्या प्रतीक्षेत होते. या ठिकाणी सुरेश हाळवणकर आले. त्यांना सत्वशील माने यांनी उठून जागा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांना थांबवत, ‘तुम्ही उठू नका, तुम्ही बसा...कारण तुम्ही थेट वरून आला आहात’, अशा शब्दात हाळवणकरांनी टोला हाणला. (प्रतिनिधी)

Web Title: The flag of wishing for Gadkari's welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.