देशसेवेचे स्फुरण; बेरोजगारीचेही शल्य-तरुणाईची भावना : सैन्य भरतीत पदवीधारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:00 AM2019-02-27T01:00:09+5:302019-02-27T01:02:13+5:30
शासकीय नोकरीच्या अपुऱ्या संधी आणि खासगी क्षेत्रात मिळत नसलेला पुरेसा पगार, आदी कारणांमुळे आम्ही उदरनिर्वाहासाठीच सैन्यात भरती होण्यासाठी प्राधान्य देत आहोत. देशसेवेची संधी, प्रतिष्ठेसह आर्थिक बळ देणारे काम हे सैन्य दलात असल्याची भावना महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : शासकीय नोकरीच्या अपुऱ्या संधी आणि खासगी क्षेत्रात मिळत नसलेला पुरेसा पगार, आदी कारणांमुळे आम्ही उदरनिर्वाहासाठीच सैन्यात भरती होण्यासाठी प्राधान्य देत आहोत. देशसेवेची संधी, प्रतिष्ठेसह आर्थिक बळ देणारे काम हे सैन्य दलात असल्याची भावना महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील तरुणाईने मंगळवारी व्यक्त केल्या. त्यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीबाबत नाराजी व्यक्त केली.
गेल्या पाच वर्षांपासून सैन्य दलातील भरतीसाठी कोल्हापूरमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. सध्या प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळावा होत आहे. त्यासाठी देशभरातून ११ हजाराहून अधिक तरुण आले आहेत. यातील काही तरुणांसमवेत ‘लोकमत’ने संवाद साधून सैन्य दलातील भरतीकडे वळण्याबाबतची त्यांची कारणे जाणून घेतली.
मुंढे (ता. कºहााड) येथील १८ वर्षीय स्वप्निल दत्तात्रय गुजले याने आपल्याला सैन्य दलाची आवड आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताची आहे. आमचे सहाजणांचे कुटुंब आहे. वडील वाहनचालक, तर आई शेतमजुरी करते. कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मला सैन्य दलातील नोकरीचा पर्याय सर्वोत्तम वाटला. गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील भरतीमध्ये पहिल्यांदा उतरलो. धावण्याच्या चाचणीत अपयशी ठरलो. भरती होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे त्याने सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील संदीप विष्णू ऐकील हा युवक दहावी उत्तीर्ण आहे. त्याचे आई-वडील मजुरी करतात. कला शाखेचे शिक्षण घेत, घरे रंगविण्याचे काम करत तो सैन्यभरतीसाठी प्रयत्न करीत आहे. मूळचा कल्लोळ (कर्नाटक) येथील असलेला, एकसंबा येथे मामाच्या हॉटेलमध्ये काम करणारा देवराज यल्लाप्पा कमते हा बी. ए. अभ्यासक्रमाच्या दुसºया वर्षात शिकत आहे. घरची शेती नाही. आई-वडील हे शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मला सैन्य दलातील भरतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय योग्य वाटत नाही.
वय असेपर्यंत सैन्य, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. राजस्थानमधील राजगड येथील बलवंतसिंग मोहनसिंग राठोड हा बी. ए. चा पदवीधर आहे. त्याची सहा एकर जमीन आहे. मात्र, ती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे घर चालविताना आई-वडिलांना कसरत करावी लागते. त्यांना चांगले दिवस दाखविण्यासाठी सैन्य दलात काम करायचे आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणाई अस्वस्थ आहे. रोजगार निर्मितीसाठी सरकारचे प्रयत्न वाढण्याची गरज असल्याचे बलवतसिंग याने सांगितले.
सैन्यदलातील नोकरीमध्ये ‘लाईफ’ : अरमान नदाफ
शासकीय क्षेत्रात नोकरीसाठी अपेक्षित जागा निघत नाहीत. खासगी क्षेत्रात पुरेसा पगार मिळत नसल्याने आम्हा तरुणांसमोर आता सैन्य दलात भरती होण्याचा एकमेव चांगला पर्याय उपलब्ध आहे. सैन्य दलातील नोकरीमध्ये ‘लाईफ’ आहे, अशी प्रतिक्रिया वारणा (ता. पन्हाळा) येथील अरमान नदाफ याने व्यक्त केली. मला सैन्य आणि पोलीस भरती होण्याची इच्छा असून, त्यासाठी २०१३ पासून तयारी करीत आहे.
बी. एस्सी. (केमिस्ट्री) पूर्ण झाल्यानंतर ग्रामसेवक, तलाठी, पीएसआय, आदी विविध शासकीय पदांच्या परीक्षा दिल्या. पण, त्यात नंबर काय लागला नाही. आतापर्यंत २२ ठिकाणी भरतीसाठी चाचणी दिली. काही गुणांनी संधी हुकल्या आहेत. पण, हार मानली नाही. भरतीमध्ये यशस्वी होणारच, असा विश्वास अरमान याने व्यक्त केला.
देशसेवा, उदरनिर्वाहासाठीच प्राधान्य
प्रादेशिक सेनेमध्ये भरती झालेल्या जवानांना वर्षातून दोन महिने प्रशिक्षणासाठी बोलविले जाते व त्या कालावधीचा मोबदला दिला जातो. त्यानंतर जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्यांना बोलावून देशाच्या कोणत्याही ठिकाणी रक्षणासाठी पाठविले जाते.
सेवारत कालावधीकरिताच केवळ लागू वेतन व इतर भत्ते देण्यात येतील. सेवारत नसलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा भत्ता मिळत नाही. या मेळाव्यात १८ ते ४२ वर्षांपर्यंतचे उमेदवार भरतीमध्ये भाग घेऊ शकतात, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी सांगितले.
ते म्हणाले, नोकरीसाठी तरुणांना सैन्यदलाचे क्षेत्र चांगले वाटत आहे. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर थेट सैन्यदलात काम करण्याची संधी मिळत आहे; त्यामुळे त्यांचा या क्षेत्राकडील कल वाढत असून, भरतीसाठी येणाºया उमेदवारांची संख्या वाढत आहे.
साडेअकरा हजार उमेदवारांची हजेरी
कोल्हापूर : कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्याच्या दुसºया दिवशी तब्बल साडेअकरा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली. आज, बुधवारी मैदानी चाचणीचा अखेरचा दिवस आहे.
कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री बटालियनतर्फे नियोजन केलेल्या भरती मेळाव्यात प्रादेशिक सैन्य भरतीसाठी २ मार्चपर्यंत कागदपत्रे तपासणी, मेडिकल तपासणी अशी भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून भरती मेळाव्यास प्रारंभ झाला. आजही प्रथम धावणे, उंची व कागदपत्रांची तपासणी केली. मोठ्या प्रमाणात भरतीसाठी उमेदवार आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला होता. दुसºया दिवशी महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक येथील उमेदवारांनी हजेरी लावली.
दोन उमेदवारांना चक्कर : युवराज बाळासाहेब हिंगोले (वय २०, रा. भोगुलवाडी (ता. धारुळ, जि. बीड), सनी संतोष ज्वारे (वय १८, सखाई रोड निपाणी (ता. चिक्कोडी) हे मंगळवारी सैन्यभरतीसाठी आले असता दुपारी भरती प्रक्रियेदरम्यान त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. पोलिसांनी त्यांना तत्काळ सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले.
कोल्हापुरातील प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आदी राज्यांतील तरुण आले आहेत. हे युवक तळपत्या उन्हामध्ये या निवड चाचणीला सामोरे जात आहेत.