अर्ज भरण्यासाठी उद्या उडणार झुंबड
By admin | Published: October 12, 2015 12:22 AM2015-10-12T00:22:39+5:302015-10-12T00:25:40+5:30
महापालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी जादा टेबलांची व्यवस्था
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत पक्षीय पातळीवर उमेदवारी जाहीर झाल्या असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. ८१ प्रभागांतून सुमारे ११३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज, सोमवारी सर्वपित्री दर्श अमावास्या असल्याने काही मोजकेच उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे तर उद्या, मंगळवारी अंतिम दिवशी घटस्थापनेचा शुभमुहूर्त साधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडणार आहे.उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेच्या सात क्षेत्रीय कार्यालयांत अर्ज स्वीकारण्यासाठी जादा टेबलांची व्यवस्थाकरण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयाच्या आवारात असणाऱ्यांनाच अर्ज दाखल करता येणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-ताराराणी, शिवसेना या प्रमुख चार आघाड्यांनी सर्वच्या सर्व ८१ प्रभागांत उमेदवार उभे करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी बहुतांशी प्रभागांत उमेदवार जाहीर केले आहेत. याशिवाय भाकप, शेकाप, हिंदू आघाडी, एस फोर ए टायगर्स, राष्ट्रीय समाज पक्ष यांनीही काही जागांवर उमेदवारी जाहीर केल्या आहेत.
आतापर्यंत सुमारे ११६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आॅनलाईनवर उमेदवारी अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता निवडणूक आयोगाने आॅफलाईन (पारंपरिक) पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारची परवानगी दिली होती. त्यानंतर सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत अर्ज भरताना होणारी गर्दी विचारात घेता दोन दिवस अगोदरच शनिवारी अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधला. आता आज, सोमवारी सर्वपित्री दर्श अमावास्या असल्याने या दिवशी काही मोजकेच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे तर मंगळवारी (१३ आॅक्टोबर) अंतिम दिवशी उमेदवारी भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. या पार्श्वभूमीवर सातही क्षेत्रीय कार्यालयांच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे तसेच मंगळवारीच सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे खिडकीतून उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयाच्या आवारात उपस्थित असणाऱ्या सर्वच उमेदवारांना कार्यालयात एकत्रित घेण्यात येणार आहे पण त्यांच्यासोबत आलेल्या सूचक, अनुमोदकांसह इतर कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेरच थांबावे लागणार आहे. दुपारी तीन वाजल्यानंतर येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज कमी पडू नयेत म्हणून सात निवडणूक कार्यालयांत एकूण सहा हजार अर्ज छापून पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभर उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक निवडणूक कार्यालयांत कर्मचाऱ्यांची संख्या तसेच नेहमीपेक्षा जादा टेबलांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना कार्यालयात घेतल्यानंतर सर्व उमेदवारांचे अर्ज जमा करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी क्षेत्रीय कार्यालयांत उमेदवारांची शुभमुहूर्त साधण्यासाठी झुंबड उडणार आहे.
पोलीस बंदोबस्तही वाढ
शेवटच्या दिवशी सातही निवडणूक कार्यालयांत एकाच प्रभागातील दोन उमेदवार समोरासमोर येऊन वादाचे प्रसंग घडण्याची शक्यता असते. तसेच अर्ज भरताना वेळेचे बंधन असल्याने होणारी गर्दी विचारात घेऊन कोणताही अनुचित प्रसंग उद्भवू नये म्हणून पोलीस यंत्रणेत नेहमीपेक्षा वाढ करण्यात येणार आहे.
‘नो व्हेईकल झोन’
गेले आठ दिवस महापालिकेच्या क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना कार्यालयाच्या आवारात आणि बाहेर दुचाकींसह चारचाकी वाहनांचे ताफे उभारल्याने मोठी गर्दी होत होती. त्यामुळे आज, सोमवारपासून निवडणूक कार्यालयापासून १०० मीटर अंतरावरच दुचाकींसह सर्व वाहने पार्किंग करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांना निवडणूक कार्यालयापासून १०० मीटर दूरवरच वाहने उभी करावी लागणार आहेत. याशिवाय या आवारात वाहने आढळल्यास त्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.