Kolhapur Airport: अचानक विमान रद्द, प्रवाशांची गोची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:05 PM2024-07-30T16:05:39+5:302024-07-30T16:07:18+5:30
एकाच महिन्यात हा प्रकार वारंवार घडल्याने या एअरलाइन्सची सेवाच बंद करण्याची मागणी होऊ लागली
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरून देशभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध असताना आता कोल्हापूर विमानतळावरील एका कंपनीची विमानसेवा अचानक वारंवार रद्द केली जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे विमान टेकऑफ करण्याच्या आधी दोन तास प्रवाशांना रद्दचा संदेश येत असल्याने प्रवाशांसह ट्रॅव्हल कंपन्यांची झोप उडाली आहे. एकाच महिन्यात हा प्रकार वारंवार घडल्याने या एअरलाइन्सची सेवाच बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-तिरुपती व कोल्हापूर-बंगळुरू या मार्गावर एका कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही सेवा नियमितपणे सुरू असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीने कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-मुंबई, बंगळुरू या मार्गावरील विमाने अचानक रद्द केल्याने प्रवाशांची चांगलीच गोची झाली.
कोणत्याही वेळेस कुठलीही कल्पना न देता विमान रद्द केले जात आहे. केवळ एका एसएमएसद्वारे प्रवाशांना दोन तास आधी याची कल्पना देऊन संबंधित कंपनी आपल्या अनागोंदी कारभाराचे वारंवार दर्शन घडवीत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
ट्रॅव्हल कंपन्यांना त्रास
कोल्हापुरातील ट्रॅव्हल कंपन्यांमार्फत अनेक नागरिक पर्यटनासाठी जगभर जातात. दोन दिवसांपूर्वी एका ट्रॅव्हल कंपनीने तिरुपतीसाठी २१ प्रवाशांचे तिकीट काढले होते. मात्र, या मार्गावरील विमान अचानक रद्द करण्यात आल्याने ट्रॅव्हल कंपनीची झोप उडाली. कोल्हापूर-मुंबई ही सेवा एखाद्या चांगल्या एअरलाइन्सला द्यावी, अशी मागणी कोल्हापूर ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केली.