विमान उड्डाण परवान्याचा प्रश्न मार्गी लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:07 AM2017-10-25T01:07:52+5:302017-10-25T01:09:42+5:30
कोल्हापूर : येथील विमानतळावरील उड्डाण परवान्याचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. हा परवाना मिळण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्याला आज, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. परवाना देण्याच्या अनुषंगाने एअरपोर्ट अॅथोरिटी आॅफ इंडिया (एएआय) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी या विमानतळाची दोन दिवस पाहणी करणार आहेत. हे अधिकारी मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्याने येथील विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला; पण विमान उड्डाणाच्या परवान्याचे नूतनीकरण, मुंबईतील टाईम स्लॉट, आदी मुद्दे अडथळा ठरले. हे अडथळे दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील टाईम स्लॉटचा प्रश्न पालकमंत्री पाटील यांनी सोडविला आहे. खासदार महाडिक यांचा विमान उड्डाण परवाना नूतनीकरणासाठी डीजीसीएच्या संचालकांकडे पाठपुरावा केला.
याअंतर्गत एएआयचे एस. बालन, कृष्णाकुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, पूजा मूल, राजेश अय्यर आणि डीजीसीएचे सुवरिता सक्सेना, मुकेश वर्मा हे कोल्हापूर विमानतळाची आज, बुधवारी आणि गुरुवारी पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर परवाना मिळणे, विमान सेवा सुरू होण्याच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.
कोल्हापूर विमानतळाचा उड्डाण परवाना सन २०११ पासून मिळालेला नाही. विमान सेवा सुरू होण्यातील हा एक मोठा अडथळा होता. हा परवाना मिळण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परवाना मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. एएआय, डीजीसीएच्या अधिकाºयांनी पाहणी केल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर लवकरच संंबंधित परवाना मिळेल. मुंबईतील टाईम स्लॉटचा प्रश्न सुटला. परवाना मिळाल्यानंतर केवळ विमान सेवा पुरविणाºया कंपनीचा मुद्दा राहणार आहे. हा मुद्दा सोडविण्यासाठी मी आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील एकत्रित प्रयत्न करणार आहे. - खासदार धनंजय महाडिक