पूरग्रस्त छोट्या व्यावसायिकांना मिळणार ५० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:24+5:302021-08-29T04:24:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विविध घटकांना २०१९ प्रमाणेच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विविध घटकांना २०१९ प्रमाणेच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. यामध्ये दुकानदार, छोटे गॅरेज, व्यवसायिक, बारा बलुतेदारांना नुकसानीच्या ७५ टक्के अथवा जास्तीत जास्त ५० हजारांपर्यंत मदत दिली जाणार आहे. टपरीधारक, हातगाडीधारकांनाही पूर्वीप्रमाणेच मदत मिळणार आहे.
यंदा जुलैमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आलेल्या महापुराने मोठे नुकसान केले आहे. २०१९ पेक्षाही पुराचे पाणी अधिक असल्याने तुलनेत नुकसानही अधिक झाले आहे. मात्र राज्य शासनाने मदतीचे निकष व रक्कमही बदलल्याने पूरग्रस्तांमध्ये संताप होता. त्यामुळे राज्य सरकारने मदतीचा निर्णय बदलून २०१९ प्रमाणे मदत केली जाईल, असे शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार आता भरपाई मिळणार आहे. छोटे गॅरेज, व्यावसायिक, हस्तकला-हातमाग कारागीर, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारकांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम अथवा ५० हजारांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी वाळू, मुरूमही उपलब्ध करून दिला जाणार आहे. जनावरांच्या गाेठ्यांच्या नुकसानीसाठी मदत दिली जाणार आहे.
एकरकमी मदतीचा गुंता...
बाधित कुटुंबाची तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने अथवा सामाजिक संस्थेने केलेले नसेल तर अशा कुटुंबांना घरभाडे म्हणून शहरी भागात ३६ हजार, तर ग्रामीण भागात २४ हजार रुपये एकरकमी मदत २०१९ला दिली होती. मात्र आता यापेक्षा कमी रकमेचे वाटप झाल्याने नवीन निर्णयानुसार वाढीव मदतीचा गुंता तयार होण्याची शक्यता आहे.
अशी मिळणार मदत....
पूरग्रस्तांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान - ग्रामीण भागात १० हजार व शहरी भागात १५ हजार
छोटे गॅरेज व इतर व्यावसायिक - नुकसानीच्या ७५ टक्के किंवा ५० हजारांपर्यंत
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी - शेतीपंपाची वीज बिल भरण्यासाठी तीन महिन्यांची स्थगिती
घरदुरुस्ती व बांधकामासाठी - आवश्यकतेनुसार ५ ब्रास वाळ व ५ ब्रास मुरूम मोफत दिला जाणार
जनावरांच्या गाेठ्यासाठी - राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रतिगोठा ९०० रुपये व राज्य शासनाकडून वाढीव ९०० असे ३ हजार रुपये मिळणार.