पुन्हा पूर... पुन्हा स्थलांतर..!
By admin | Published: August 7, 2016 11:44 PM2016-08-07T23:44:34+5:302016-08-07T23:44:34+5:30
शहरातील सखल भागांत पाणी
जयंती नाला परिसराला दुसऱ्यांदा पुराचा वेढा; सुतारवाडा, शाहूपुरीतील ३२ कुटुंबांचे स्थलांतर
कोल्हापूर : गेले दोन दिवस पावसाने उसंत दिली असली, तरी धरणांतून विसर्ग सुरू असल्याने शहरातील पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून, शहरातील सखल भागांत पाणी घुसले आहे. सुतारवाड्यातील ३२ कुटुंबांतील १४५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. राजाराम बंधाऱ्यासह शाहूपुरी कुंभार गल्ली, रंकाळा तलाव, कळंबा तलाव या ठिकाणची रविवारी जिल्हा प्रशासनाने पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पुराचे पाणी येत असलेल्या परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सर्व ती तयारी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
पावसाचा जोर कमी असला तरी पंचगंगेच्या पात्रातील पाणी वाढत असल्याने ते जामदार क्लबपर्यंत आले होते. तसेच सायंकाळी ते शहर वाहतूक शाखेजवळ जयंती नाल्यावर येऊ लागले होते. त्यामुळे तातडीने सुतारवाडा येथील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. शाहूपुरीतील कुंभार वसाहतीत गुडघाभर पुराचे पाणी आल्यामुळे कुंभार बांधवांनी तयार केलेल्या व वाळलेल्या गणेशमूर्ती शेडमधून अन्यत्र हलविल्या. कुंभार बांधवांची गणेशमूर्ती हलविताना दमछाक झाली होती. व्हिनस कॉर्नर परिसरातही पाणी वाढल्याने येथील व्यवहार ठप्प झाले.
पुराचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी रविवारी सकाळी कळंबा तलावाची पाहणी केली. तेथील माहिती घेऊन ते रंकाळा तलाव येथे आले व दुपारी राजाराम बंधारा येथे आले. तिथे पाहणी करून ते शिरोळला रवाना झाले. यावेळी आयुक्त डॉ. पी. शिवशंकर, उपायुक्त विजय खोराटे, ‘एनडीआरएफ’चे पी. वैरवनाथ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, तहसीलदार योगेश खरमाटे, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे होते.
टोल फ्री आणि दक्षता पथक
आपत्कालीन स्थितीच्या मुकाबल्यासाठी अग्निशमन विभागाकडे मुख्य आपत्ती नियंत्रण कक्ष महापालिकेच्या इमारतीमध्ये स्थापन करण्यात आला आहे. त्याचा टोल फ्री क्रमांक १०१ असा आहे. तसेच आरोग्य विभागाच्या आपत्तीकाळातील तक्रारी संदर्भात २५४० २९० वर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार विभागीय कार्यालयांमध्ये दक्षता पथके २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहेत.
कळंबा ओव्हरफ्लो...
कळंबा : कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून तलावातील सांडव्यावरून आणि बाजूने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. हे पाणी जयंती नाल्याच्या पत्रातून पुढे जात असल्याने शहराच्या सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
४९ कुटुंबांतील २३१ जणांचे स्थलांतर
पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने कोल्हापुरात रविवारी सायंकाळी सुतारवाड्यातील ३२ कुटुंबांमधील १४५ नागरिकांचे स्थलांतर दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ व मुस्लिम बोर्डिंग येथे केले. त्यानंतर पुन्हा रात्री नऊपर्यंत कदम मळ्यातील नऊ कुटुंबांतील ४४ नागरिकांना तुळजाभवानी हॉल येथे, तर साळोखे मळ्यातील पाच कुटुंबांमधील ३१ नागरिकांचे इतरत्र स्थलांतर व तीन कुटुंबांतील ११ नागरिकांचे समता हायस्कूल येथे स्थलांतर करण्यात आले आहे.
दोन घरांना तातडीने खाली करण्याच्या सूचना
रविवारी सायंकाळी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी जयंती नाला येथील विश्वकर्मा अपार्टमेंटची पाहणी केली. त्यानंतर दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात सुतारवाड्यातील कुटुंबांना स्थलांतर केले. तेथून लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथील पूरस्थिती पाहून महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतीची पाहणी केली. शुक्रवार पेठेतील केसापूर पेठेतील दोन धोकादायक घरांना नोटीस देऊन तातडीने घर खाली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पंचगंगा नदीतील पूरस्थितीचा आढावा घेऊन शिवाजी पूल येथे आले. या पुलावरील ‘वाहतूक बंद’ची माहिती घेऊन सिद्धार्थनगर येथे आले. यावेळी येथील कुटुंबांना सतर्क राहण्याच्या सूचना पी. शिवशंकर यांनी दिल्या.