महापुराने शेतीचे ६६ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:50+5:302021-07-27T04:25:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापू : जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या व ओढ्यांना आलेल्या पुराने ५८ हजार ५०० हेक्टरमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापू : जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या व ओढ्यांना आलेल्या पुराने ५८ हजार ५०० हेक्टरमधील पिके बाधित झाली आहेत. यामुळे साधारणत: ६६ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील पाणी कमी झाल्यानंतर नुकसानाचे पंचनामे केले जाणार आहेत. शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, वारणासह इतर नद्या व ओढ्यांच्या परिसरातील भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभ्या पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. पाऊस कमी झाला असला तरी पिके अद्याप पाण्याखाली आहेत. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक २० हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ करवीर, हातकणंगले, चंदगड तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
सध्या पुराचे पाणी ओसरु लागले असले तरी अद्याप पिके पाण्यात आहेत. पावसाने अशीच उसंत दिली तर आणखी तीन, चार दिवसांनी पिकांचे पंचनामे सुरु होऊ शकतात.
कोटः
नजर अंदाजानुसार जिल्ह्यात ५८ हजार ५०० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. पाऊस थांबला असला तरी शिवारात अद्याप पाणी आहे. त्यामुळे तीन-चार दिवसात पंचनामे सुरु होतील.
- ज्ञानदेव वाकुरे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर.
नजर अंदाजानुसार बाधित क्षेत्र, हेक्टरमध्ये
तालुका बाधित क्षेत्र
शिरोळ : २० हजार
करवीर - ७ हजार
हातकणंगले - ७ हजार ५००
चंदगड - २ हजार १००
पन्हाळा - ३ हजार ३००
राधानगरी - ३ हजार ६००
भुदरगड - ३ हजार ९००
गगनबावडा - ९००
शाहुवाडी - २ हजार २००
आजरा - १ हजार ३००
गडहिंग्लज- १ हजार ६००
कागल - ३ हजार ६००