भरपावसातही गर्दीचा महापूर

By admin | Published: September 15, 2016 12:15 AM2016-09-15T00:15:45+5:302016-09-15T00:30:57+5:30

आबालवृद्धांचा आनंद द्विगुणित : देखावे पाहण्यासाठी अवघे शहर रस्त्यावर, वाहतुकीची मोठी कोंडी

The flood of floods | भरपावसातही गर्दीचा महापूर

भरपावसातही गर्दीचा महापूर

Next

कोल्हापूर : दिवसभर पावसाची भुरभुर, सायंकाळनंतर रस्ते गर्दीने फुलू लागले; रात्री नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहनांची कोंडी झाली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला आकर्षक गणेशमूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, शनिवार पेठ परिसरांत आबालवृद्धांच्या गर्दीने पावसातही मंडळांचा उत्साह वाढविला. एका बाजूला मंडळांच्या विद्युत रोषणाईने शहर झळकले असले तरी दुसऱ्या बाजूला मंडळाचे कार्यकर्ते आज, गुरुवारी होणाऱ्या विसर्जनाच्या तयारीत मग्न होते; पण भुरभुर पडणाऱ्या पावसामुळे शहराच्या लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ भागात गणेशभक्तांच्या उत्साहावर पावसाने विरजण पडल्याने या ठिकाणी गर्दीवर परिणाम दिसून आला.
दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाची भुरभुर चालूच राहिल्याने सायंकाळी सहानंतर गणेशभक्तांंनी देखावे पाहण्यासाठी बाहेर पडणे पसंत केले. भुरभुर पाऊस असल्याने अनेकांनी चारचाकी गाडीतून जाणे पसंत केल्याने संपूर्ण शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली; पण सायंकाळी सात वाजल्यानंतरही गणेशभक्तांची गर्दी रस्त्यांवर वाढू लागली. त्यामुळे शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी दिवसभर बंद ठेवले होते. रात्री आठ वाजल्यानंतर पाऊस काही प्रमाणात वाढला असतानाही गणेशभक्तांनी राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक, शनिवार पेठ, बुधवार पेठेत गर्दीचा महापूर लोटला होता. पावसाची भुरभुर असल्याने तिचा अंदाज घेत अनेकजण छत्री, रेनकोट घेऊन देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले. वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक देखाव्यांना भाविकांकडून दाद मिळत होती.
वरुणराजांच्या साथीनेच अनेकांनी देखावे पाहण्याचा आनंद घेतला. शहराच्या काही भागांत गर्दीचा महापूर तर काही भागात गर्दीवर वरुणराजाचा परिणाम दिसून आला. ठरावीक भागांत सारे शहर रस्त्यावर अवतरल्याचा भास होत होता. शहरात अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंगमुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती. (प्रतिनिधी


सजीव देखाव्यांवर परिणाम
मंडळांनीही सौम्य पावसाचा अंदाज घेत आपले देखावे बुधवारी थोड्या उशिराच सुरू केले. कलात्मक देखावे लवकर सुरू झाले असले तरीही सजीव देखावे सुरू करण्यावर मात्र परिणाम झाला.
गेले दोन-तीन दिवस सायंकाळी सात वाजता सुरू होणारे सजीव देखावे पावसामुळे रात्री आठ वाजल्यानंतरच सुरू झाले.
प्रसादाचाही आधार
बहुतांश गणेश मंडळांनी भाविकांना पुलावा, कांदा-पोहे, वडा-पाव, चहा अशा प्रसादाची सोय केल्याने त्याचा देखावे पाहण्यासाठी आलेल्या भक्तांनी यथेच्छपणे आस्वाद घेतला.
यामध्ये बहुतांश मंडळांनी पुलावाचा प्रसाद म्हणून वाटप केले. त्यामुळे हा प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडत होती.


बालकांना आकर्षण
यंदाच्या वर्षी बालकांना आकर्षण करण्यासाठी अनेक मंडळांनी प्रयत्न केला असून, गणेशमूर्तीपासून देखाव्यावर त्याचे प्रतिबिंब दिसून
आले. अनेक ठिकाणी मेरी-गो-राउंड, पोकोमॅन, थ्री डी गणेश, पावसातील बालगणेश, जंपिंग बलून, आदी लक्षवेधी देखावे करून बालकांना आकर्षित करून गर्दी खेचण्यात अनेक मंडळांनी यश मिळविले आहे.

Web Title: The flood of floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.