महापुराचा फटका; खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला गेले तडे, दुरुस्तीसाठी ११० कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:31 PM2022-03-21T13:31:55+5:302022-03-21T13:32:18+5:30
खिद्रापूर (ता. शिरोळ) कोपेश्वर मंदिराची पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार तत्काळ दुरुस्तीला सुरुवात होणार आहे.
दत्तवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) कोपेश्वर मंदिराची पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार तत्काळ दुरुस्तीला सुरुवात होणार आहे. यासाठी ११० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.
खिद्रापूर कोपेश्वर मंदिराची रविवारी सकाळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी पाहणी केली. यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर म्हणाले, खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासाठी यापूर्वी साडेबारा कोटींच्या निधीची तरतूद केली होती. मंदिराच्या दुरुस्तीसाठी शनिवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्टचे मुख्य सभापती शिखा जैन, किरण कलमदानी यांनी दुरुस्तीचा आराखडा तयार केला असून, यासाठी ११० कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच हैदरखान मोकाशी, दयानंद खानोरे, जब्बार मोकाशी यांनी मंदिराच्या विदारक स्थितीची माहिती दिली. यावेळी पोलीस पाटील दीपाली पाटील, सचिन पाटील, हिदायत मुजावर, अमजद मोकाशी आदी उपस्थित होते.