पूर पातळी घटली, पण रस्ता कोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:29+5:302021-07-26T04:23:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिल्याने कोल्हापूरच्या पूरपातळीत तीन फुटांनी घट झाली आहे. शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिल्याने कोल्हापूरच्या पूरपातळीत तीन फुटांनी घट झाली आहे. शहरातील अनेक ठिकाणचे पाणी ओसरले असले तरी सखल भागात पाणी तुंबूनच आहे. दरम्यान, रविवारी दुपारनंतर ‘राधानगरी’ धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. सलग तिसऱ्या दिवशीही कोल्हापूरहून पुणे, बेळगाव, कोकणाकडे जाणारे रस्ते बंदच राहिले आहेत.
धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले असून काही धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. शहरातही दिवसभर एखादे, दुसरे सरवट वगळता पाऊन नसल्याने अनेक भागांतील पाणी उतरले. सकाळीच दसरा चौकातून वाहतूक सुरू झाली. व्हीनस कॉर्नर परिसरात अजूनही पाणी आहे. कसबा बावड्याकडे जाणारा रस्ताही अजून पाण्याखाली असून पेट्रोल आणि पाण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र रविवारीही पहावयास मिळाले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर शिरोळ तालुक्याचा दौरा करून तेथील पूरग्रस्तांना धीर दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत सायंकाळपासून आढावा बैठक घेतली.
चौकट
ठाकरे, पवार यांच्या दौऱ्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला नव्हता, तर पवार हे येणार इतकेच निश्चित झाले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठकांची तयारी आणि जिल्हा परिषदेची स्वच्छता करून घेण्यात आली. कारण याच ठिकाणी आढावा बैठक घेतली जाऊ शकते.
चौकट
राधानगरीच्या विसर्गाचा परिणाम सौम्य करण्यासाठी प्रयत्न
धरणक्षेत्रातील प्रचंड पावसामुळे जरी कोल्हापूर शहरासह काही तालुके जलमय झाले असले तरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या राधानगरी धरणातून रविवारी दुपारपर्यंत पाणी बाहेर पडले नव्हते. त्यामुळे तो एक दिलासा होता. भर पावसात राधानगरीचे उघडलेले दरवाजे आणखी गंभीर स्थितीला निमंत्रण ठरले असते. रविवारी दुपारनंतर या धरणाचे चार दरवाजे उघडले असले तरी ५६०० क्युसेकचे हे पाणी नदीत येणार असल्याने कुंभी आणि कासारी धरणातून २८०० क्युसेकहून अधिक पाणी रोखण्यात आले आहे. त्यामुळे जादा पाण्याचा परिणाम सौम्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चौकट
सर्वांचे लक्ष हायवे कडे
सलग तिसऱ्या दिवशी बंद झालेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग कधी सुरू होणार याचीच चौकशी दिवसभर केली जात होती. थेट गोव्याहून, मुंबईहून नागरिक फोन करून याबाबत माहिती घेत होते. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. मात्र, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताही हाय वे वर जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा वेग किती आहे याचा अंदाज घेण्यात आला. तेव्हा तो वाहतूक खुला करण्यासाठी धोक्याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोमवारी सकाळी याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्यावर्षी पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५० फूट असताना राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आला होता. रविवारी सायंकाळी ही पातळी ५१ फूट होती. त्यामुळे सोमवारी सकाळी हा महामार्ग खुला होण्याची शक्यता आहे.