पूरग्रस्त निवारण समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 06:11 PM2019-12-23T18:11:15+5:302019-12-23T18:15:12+5:30
विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
कोल्हापूर : आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने शिरोळ तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या शिरोळला आपत्तीग्रस्त तालुका घोषित करुन विविध मायक्रो फायनान्स, बॅँक, पतसंस्थांनी बचत गटांना दिलेली कर्जे माफ करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
दुपारी दीडच्या सुमारास बिंदू चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. ‘भयमुक्त महिला...कर्जमुक्त महिला...’, ‘पूरबाधित महिला-पुरुषांना रोजगार भत्ता मिळालाच पाहीजे... ’,‘घरफाळा, पाणीपट्टी माफ झालीच पाहीजे...’,‘महामंडळाचे अनुदानीत कर्ज तात्काळ मिळाले पाहीजे’ असे फलक घेतलेल्या महिलांचा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी काही काळ तीव्र निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.