Kolhapur Flood: शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम, ५ हजार लोकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:50 PM2024-07-30T16:50:47+5:302024-07-30T16:51:29+5:30
प्रशासन सज्ज : ४ हजार जनावरेदेखील सुरक्षितस्थळी; पावसाच्या विश्रांतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात महापूरसदृश स्थिती अजूनही कायम आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून जवळपास पूरबाधित गावांतील पाच हजारांहून अधिक नागरिक सुरक्षितस्थळी स्थलांतरित झाले असून, या गावातील चार हजार जनावरेदेखील बाहेर काढण्यात आली आहेत.
कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले. २०१९ व २०२१ मधील अनुभव पाहता प्रशासनाच्या सूचनेअगोदरच पूरबाधित नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. सुरुवातीला खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, दानवाड, अकिवाट, कवठेसार, हेरवाड, कुरुंदवाड या गावांतील नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.
तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने यांत्रिकी बोटी सज्ज ठेवल्या आहेत. एन.डी.आर.एफ. जवानांची तुकडीदेखील दाखल झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूरग्रस्तांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील पूर परिस्थिती अजूनही कायम आहे. गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, दत्त कारखाना शिरोळ, पद्माराजे विद्यालय शिरोळ, कुंजवन उदगाव याबरोबरच कुरुंदवाड येथील शाळांमध्येदेखील पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास बाराशेहून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसला असून चारशेहून अधिक कुटुंबे निवारा केंद्रात तर तेराशेहून अधिक कुटुंबांनी स्वत:ची सोय केली आहे. जवळपास चार हजारांहून अधिक पशुधनाचेही स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये छावणीमध्येदेखील जनावरांची सोय करण्यात आली आहे.
पूरग्रस्तांनी शोधला पर्याय
२०१९ व २०२१ साली आलेल्या महापुराचा अनुभव घेता प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता पूरबाधित नागरिकांनी संभाव्य पुराचा धोका ओळखून पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे आसरा घेतला आहे. शिवाय पशुधनाचीही व्यवस्था केली आहे. प्रशासनानेही पूरग्रस्तांबरोबर पशुधनाच्या सोयीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.