कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:23 PM2022-08-10T12:23:17+5:302022-08-10T16:48:35+5:30

नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद

Flood situation in Kolhapur district, Two automatic gates of Radhanagari dam open; Shivaji University Exam Postponed | कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापुरात पूरपरिस्थिती, राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले; पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने पूरपरिस्थिती उद्धभवण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा आज, पहाटे खुला झाला. एकूण सात दरवाज्या पैकी पहाटे 5:30 वाजता 6 नंबरचा दरवाजा खुला झाला. यानंतर सकाळी 8.55 वाजता गेट क्रमांक 5 खुले झाले. दुपारी 2:20 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 उघडला. यानंतर दुपारी  3:20 वाजता चौथा दरवाजा उघडला. असे एकूण 3, 4, 5, 6 नंबरचे चार दरवाजे उघडले आहेत. या चार दरवाज्यातून 5712 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक असा एकूण 7312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखीन दरवाजे सुरू होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ

राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे.  आज, दुपारी 3 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फूट  09" इंच इतकी झाली होती. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पंचगंगेवरील 76 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चित्रदुर्ग मठात आतापर्यंत १६ कुटुंबांचे स्थलांतर

जयंती नाल्यालगत असणाऱ्या सुतारवाडा परिसरातील पुराचे पाणी वाढत असलेने १६ कुटुंबाचे चित्रदुर्ग मठात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थलांतर झाले. यात १६ पुरुष, २२ स्त्रीया आणि २२ लहान मुलांचा समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर  परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या आज, बुधवारी व उद्या (गुरुवारी) होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकांनी जाहीर केले आहे.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा 96.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर, हातकणंगले- 12 मिमी, शिरोळ -3.9 मिमी, पन्हाळा- 48.9 मिमी, शाहूवाडी- 56.2 मिमी, राधानगरी- 54.2 मिमी, गगनबावडा- 96.9 मिमी, करवीर- 26.4 मिमी, कागल- 13.6 मिमी, गडहिंग्लज- 13.9 मिमी, भुदरगड- 35.6 मिमी, आजरा- 44.5 मिमी, चंदगड- 51.4 मिमी असा एकूण 32.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा

राधानगरी 236.13 दलघमी, तुळशी 88.19 दलघमी, वारणा 879.31 दलघमी, दूधगंगा 599.89 दलघमी, कासारी 65.46 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.25 दलघमी, पाटगाव 93.49 दलघमी, चिकोत्रा 39.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

'या' मार्गावर पाणी

करूळ व भुईबावडा घाट बंद असल्याने फोंडा राधानगरी मार्गे वाहतूक चालू आहे. कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कोकणात जाणारे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. निपाणी राधानगरी रस्त्यावर मुरगूड निढोरी दरम्यान वेदगंगा नदीचे पाणी आले आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहनधारकांना वाहनचालवताना कसरत करावी लागत होती. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने हेरवाड अब्दुल लाट मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरुनही वाहतूक दुपारपर्यंत ठप्प होण्याची शक्यता आहे.

Web Title: Flood situation in Kolhapur district, Two automatic gates of Radhanagari dam open; Shivaji University Exam Postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.