कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर, ८४ बंधारे पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 06:27 PM2019-08-03T18:27:52+5:302019-08-03T18:56:39+5:30
कोल्हापूर पूरस्थिती : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. पंचगंगेने रौद्ररूप धारण केले असून, शुक्रवारी सायंकाळी मच्छिंद्री झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगेची पाण्याची पातळी ४४.१ फूट इतकी झाली असून आतापर्यंत ५४ कटुंबातील २१० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. जवळपास ८४ बंधारे पाण्याखाली गेले असून १९ एसटी मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून, अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजरा तालुक्यातील मौजे इटे येथील केशव बाळू पाटील (वय ५५) हे शेतातून परत येत असताना जांभूळ शेताचा ओढा पात्रातून वाहून गेले.
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. पंचगंगेने रौद्ररूप धारण केले असून, शुक्रवारी सायंकाळी मच्छिंद्री झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगेची पाण्याची पातळी ४४.१ फूट इतकी झाली असून आतापर्यंत ५४ कटुंबातील २१० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. जवळपास ८४ बंधारे पाण्याखाली गेले असून १९ एसटी मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून, अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजरा तालुक्यातील मौजे इटे येथील केशव बाळू पाटील (वय ५५) हे शेतातून परत येत असताना जांभूळ शेताचा ओढा पात्रातून वाहून गेले.
शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी राहिला. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ८५९.२२ मिली मीटर पाऊस झाला. सर्वाधिक १४३.५० मिली मीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला असून तब्बल आठ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ५ इतर जिल्हा मार्ग व ५ ग्रामीण मार्गावरील वाहतूक पुर्णपणे खंडीत झाली आहे. त्याशिवाय २४ इतर जिल्हा मार्ग व २६ ग्रामीण मार्गावरील वाहतूक अंशत: खंडीत झाली आहे.
कोल्हापूर शहरात एसपी आॅफिस जवळ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये दुचाकी पार्किंग केलेल्या जागेत झाड पडल्याने काही दुचाकींचे नुकसान झाले आहे. शहरातील दिलबहार तालमीजवळ राहणाऱ्या एका महिलेला विजेचा शॉक बसला आहे. फुलेवाडी रिंग रोड, गडकरी कॉलनी इथं जवळपास दोन फूट खाली रस्ता खचला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्या मुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान सर्वत्र सज्ज आहेत. यामध्ये जीवन आधार, जीवन ज्योत, आधार रेसक्तू, पास रेस्क्यूं, स्वराज्य फाऊंडेशन, जीवन मुक्ती आदी सेवाभावी संस्था सहभागी झाल्या आहेत.
डोंगर खचण्याच्या अनेक घटना
अतिवृृष्टीमुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत. पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी येथे डोंगर खचू लागल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे.
पन्हाळा तालुक्यातील मौजे पोहाळवाडी येथील कृषी विभागाचा छोटा माती नाला बंधारा खचून फुटल्यामुळे दोन एकर शेतीचे क्षेत्र वाहून नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील मौजे परखंदळे येथे सुमो गाडी मुख्य रस्त्यावरून सात ते आठ फूट उंचीवरून शेतामध्ये पडली असून गाडीचे नुकसान झाले आहे, मात्र कोणीही जखमी झालेले नाही. मौजे चांदमवाडी येथे कृषी विभागामार्फत बांधलेला माती नालाबांध फुटला आहे. अतिवृष्टीमुळे सांडवाच्या बाजुचे भूसख्खलन होवून माती व झाड सांडव्यात येवून सांडवा बंद झाला आहे. कोणतीही जिवीत वा शेतीचे नुकसान नाही.
५४ कटुंबातील २१० व्यक्तींचे स्थलांतर
आतापर्यंत ५४ कटुंबातील २१० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. इचलकरंजी येथील शेळके मळा या नागरीवस्तीत पुराचे पाणी शिरल्याने तेथील ७ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गणेश कॉलनी येथे अंशता ३४ घरामध्ये पाणी शिरल्याने येथील कुटूंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
चिखली येथील शाहूवाले माळ आंबेवाडी कमानी जवळील १२ कुटुंबातील ऐकून ५७ व्यक्तींचे आंबेवाडी येथील शाळेत स्थलांतरित करण्यात येत आहे. करवीर तालुक्यातील निलेवाडी गावी पूरपरिस्थितीमुळे अतिरिक्त गॅसचे वाटप करण्यात येत आहे. आरे, गाडीगोंडवाडी येथील कुटूंबाचेही स्थलांतर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी
वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे, धरण ९२ टक्के भरल्याने दुपारी विसर्ग वाढण्यात आला असून त्यातून प्रतिसेंकद १६३५४ घनफुट पाणी वारणा नदीत घुसत असल्याने पंचगंगेतील पाणी वाढले आहे.
अलमट्टीतून विसर्ग वाढविला
वारणा, कृष्णा आणि पंचगंगेने घेतलेले रौद्ररूप पाहता अलमट्टी धरणातून शनिवारी विसर्ग वाढविला. प्रतिसेंकद ९२६१ घनफुट विसर्ग सध्या सुरू असल्यानेच कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती काहीसी नियंत्रणात आहे.
‘मच्छिंंद्री’ म्हणजे काय?
पंचगंगेच्या पाण्याची पातळी ४३ फुटांच्या वर गेली की शिवाजी पुलाचा पिलर आणि आर्चच्यामधील कारनेसला पाणी लागले पंचगंगेला ‘मच्छिंंद्री’ झाली, म्हणजे महापूर आला असे म्हटले जाते. पिलरच्या शेवटच्या टोकाचा आकार त्रिकोणी आहे. त्यावर पाणी थडकले की माशासारखे दिसते; त्यामुळेही ‘मच्छिंद्र झाली’ असे म्हटले जाते.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १९ एसटी मार्ग बंद
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १९ एस.टी. मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर- गगनबावडा, गडहिंग्लज -नांगनुर, गडहिंग्जल-ऐनापूर, गडहिंग्जल-कोवाड, गडहिंग्लज-नूल, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कूरणे/भूजवडे, कुरूंदवाड-बस्तवाड, कुरूंदवाड-दानोळी कवठेसार, कागल-बस्तवडे, कागल-बानगे, राधानगरी-कारीवडे, गगनबावडा-कोल्हापूर, आजरा-चंदगड, आजरा-खेटवडे या एकोणीस मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
महे-शेळकेवाडी रस्त्या दरम्यान असलेल्या ओढ्याच्या पुलावर २ फूट पाणी आलेले आहे. कुरुंदवाड भैरेवाडी दरम्यान पंचगंगा नदीवर असलेला जूना पुल सकाळी पाण्याखाली गेला. कोल्हापूर-गारगोटी, गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- कोदाळी रस्त्यावर ३ फूट पाणी आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चंदगड, हिंडगाव, इब्राहीमपूर, आजरा मार्गावर इब्राहीमपूर पुलावर ३ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे, मात्र, कानूर, गवसे, इब्राहीमपूर, अडकूर या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. तसेच गुडवले, हेरे, सावर्डे, नांदवडे, करंजगाव, हलकर्णी रस्त्यावर करंजगाव येथील पुलावर तीन फूट पाणी आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पाटणे फाटा, माणगाव ते कोवाड रस्ताही माणगाव बंधाऱ्यांवर तीन फूट पाणी आल्याने बंद आहे, मात्र आमरोली, सोनारवाडी, माणगाव, तांबूळवाडी या मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे. वेंगुर्ला, बेळगाव, बेल्लारी रस्त्यावरही दाटे गावाजवळ ३ फूट पाणी आल्याने येथील वाहतूक बंद आहे, मात्र, आमरोली, सोनारवाडी, माणगाव, तांबूळवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे. फये, शेनगाव रस्तावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरु आहे.
कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे पाणी आल्याने वाठार बोरपाडळेमार्गे पयार्यी मार्ग वाहतूक सुरु आहे. कोल्हापूर -राजापूर मार्ग पालीमार्गे सुरु असून कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मांडुकली आणि बालिंगा पुलाजवळ पाणी आले आहे. गगनबावडा पोलीस यांचे कडून लोंघे येथून वाहतूक बंद करणेत आलेली आहे.