पंचगंगेने दिला महापुराचा 'इशारा', कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद; राधानगरी धरण ९० टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 02:41 PM2024-07-23T14:41:03+5:302024-07-23T14:42:59+5:30
७९ बंधारे पाण्याखाली; ३८ मार्गांवरील वाहतूक ठप्प
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल, साेमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेने इशारा पातळी (४१.२ फूट) ओलांडली. तब्बल ७९ बंधारे आणि ३८ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ली गावाजवळ पुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे.
राधानगरी धरण ९० टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात ‘वारणा’ धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ हाेत असून, पाणी सांडव्यापर्यंत पोहोचल्याने ‘वारणा’ नदीतील विसर्गही वाढल्याने पाऊस जरी कमी झाला असला तरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून जाेरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रात मात्र अद्याप पाऊस आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून, राधानगरी ९० टक्के तर वारणा ८० टक्के भरले आहे.
आठवड्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शन
गेली आठ दिवस एकसारखा पाऊस असल्याने ऊन पडलेच नव्हते. सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने दुपारी सूर्यनारायणाने दर्शन दिले.
एस.टी.चे सोळा मार्ग बंद
महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एस.टी.चे सोळा मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या मार्गांचा समावेश आहे.
असे आहेत मार्ग बंद..
राज्य मार्ग - ८
प्रमुख जिल्हा मार्ग - १६
ग्रामीण मार्ग - १४