महापुराचा धोका कायम, दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत अर्ध्या फुटाने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 06:28 AM2024-07-28T06:28:14+5:302024-07-28T06:28:54+5:30
शिरोळ तालुक्याला पुराचा विळखा
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग कायम राहिल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात केवळ अर्ध्या फुटाने वाढली असून, सध्या ४७.६ फूट पाणीपातळी आहे. जिल्ह्यातील ९८ बंधारे पाण्याखाली असून ८८ मार्ग बंद आहेत.
पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे काम वेगाने सुरू केले आहे. शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड परिसरात पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. पाऊस जरी कमी झाला असला, तरी प्रशासन सतर्क असून, पुराच्या पातळीवर नजर ठेवून आहे. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी जयंती नाल्याचे पाणी शिरल्याने रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सांगलीत शनिवारी कृष्णा नदीच्या पातळीत माेठी वाढ झाल्याने काेणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. कोयना धरण ७८.८४ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
पुराचा गावाला वेढा, गर्भवती नावेतून रुग्णालयात
गडचिरोली/नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान सुरूच असून, सिरोंचा तालुक्यातील कर्जेली गावालाही २६ जुलैला पुराने वेढा टाकला. यावेळी एका गर्भवतीला नावेतून रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्यामुळे ती सुखरूप दवाखान्यात भरती झाली. पुरामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दहा-बारा दिवसांपासून विदर्भात थैमान घालणारा पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे चार दिवस ३१ जुलैपर्यंत विदर्भात जाेरदार पावसाची शक्यता कायम आहे. यात २९ व ३० जुलै राेजी विजांचा कडकडाटही हाेण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत उसंत घेत पावसाचा दिलासा
रत्नागिरी : रेड अलर्ट असतानाही शुक्रवारी पावसाने सर्वच तालुक्यांमध्ये उसंत घेत विश्रांती घेतली आहे. शनिवारीही सकाळी पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. परंतु हलक्या किरकाेळ सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली होती.
सिंधुदुर्गात संततधार सुरूच, घरांचे नुकसान
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. संततधार पाऊस कोसळत नसला तरी वादळवाऱ्यासह बरसत असल्याने झाडे पडून, घरांची छप्परे उडून मोठे नुकसान होत आहे.