उद‌्ध्वस्त घरात पूरग्रस्तांचा जड अंतःकरणाने प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:23+5:302021-07-29T04:24:23+5:30

नवे पारगाव : महापुराचं रौद्ररूप धारण केलेल्या वारणामाईने हातकणंगले तालुक्यातील काठावरची निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी ही ...

Flood victims enter the dilapidated house with heavy hearts | उद‌्ध्वस्त घरात पूरग्रस्तांचा जड अंतःकरणाने प्रवेश

उद‌्ध्वस्त घरात पूरग्रस्तांचा जड अंतःकरणाने प्रवेश

Next

नवे पारगाव : महापुराचं रौद्ररूप धारण केलेल्या वारणामाईने हातकणंगले तालुक्यातील काठावरची निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी ही गावे आपल्या कवेत घेतली. शुक्रवारी पहाटे आलेल्या महापुराने मंगळवारी सकाळी आपली मगरमिठ्ठी सैल केली. वारणा काठावरील निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी या पूरबाधित गावांत जाणारे सगळे मार्ग खुले झाले. तब्बल पाच दिवस वारणेच्या महापुराने अनेकांचे संसार मोडून पडले. ..देवा..... अशी दुर्दैवी वेळ आमच्या नशिबी पुन्हा येऊ देऊ नकोस..! अशी याचना करत पूरग्रस्तांचे पाय गलबलल्या मनाने आपल्या घराकडे वळले.

महापुराने भग्न झालेलं आपलं घर बघून तर काहींच्या काळजाचा ठोका चुकला. गावकऱ्यांनी गावात जाऊन घरातील पाणी व गाळ बाहेर काढण्याचे काम मंगळवारी सकाळपासून सुरू केले. मंगळवारी एका दिवसात निलेवाडीत सतरा म्हशींना मीठ टाकून आपल्या शेतात पुरण्याचे काम बळीराजाने केले. ज्या पशुधनावर संसार तारला जात होता त्यालाच महापुरात तिलांजली मिळाली. अजून मृत व दावी कापून सोडलेल्या जनावरांची शोधाशोध करण्यात गावकरी व्यस्त आहेत.

वारणेच्या महापुरानंतर पिके व धान्याचा कुजट व कुबट वासाचा दर्प गावाच्या गल्ली गल्लीत सुटला आहे. बहुसंख्य गावकरी घरातील दीड फूट असणारा गाळ काढण्यात व्यस्त आहेत. अत्यंत जड अंत:करणाने पूरग्रस्त माता-भगिनी आपला विस्कटलेला संसार लावायच्या कामाला लागल्या आहेत. खेड्यातील बहुसंख्य घरे ही पांढऱ्या मातीत उभारली आहेत. महापुराच्या पाण्याने घरे भग्न झाली आहेत.

बुधवारी सकाळी केलेल्या पाहणीत निलेवाडी ३५, जुने पारगाव ८७, जुने चावरे २७ घरे ढासळली आहेत. भग्न झालेल्या घरातील पूरग्रस्तांना आल्या पावली परत दुसरीकडे आसरा घ्यावा लागला आहे. पूरग्रस्तांची भग्न घरे उभा करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. वारणेच्या महापुराने निलेवाडीची साडे तीनशे एकर, पारगावची पाचशे एकर, चावरेची दोनशे एकर तर घुणकीची सहाशे एकर पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराने शेत-शिवारातील चारा कुजला असल्याने पशुधनही अडचणीत आहे.

फोटो: 1.निलेवाडीत महापुरात मेलेली जनावरे. 2.महापुरात भग्न झालेली घरे. 3.महापुरात अखंड शिवार पाण्याखाली गेले.(छाया: दिलीप चरणे)

Web Title: Flood victims enter the dilapidated house with heavy hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.