पूरग्रस्तांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीतच राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:22 AM2021-07-26T04:22:59+5:302021-07-26T04:22:59+5:30
कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच ...
कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच जनावरांनाही चारा छावण्यांमध्ये ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला भेट दिल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांची आस्थेने चौकशी केली.
पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या-दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करूया, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला, तसेच १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी येथेच राहावे. आपल्या राहण्याची, जेवणाची आणि जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली जाईल, ‘गोकुळ’च्यावतीने पशुखाद्य दिले जाईल. गुरुदत्त कारखान्याप्रमाणेच दत्त, जवाहर, शरद साखर कारखान्यांचे चेअरमन यांनाही जनावरांना चारा पुरवण्यासाठी विनंती करू, असे सांगितले.
यावेळी पूरग्रस्तांनी प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद देत कारखाना छावणीत नाष्टा, जेवणाची चांगली सोय केल्याचेही आवर्जून सांगितले. गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १५०० पूरग्रस्त व त्यांच्या ८०० जनावरांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पूरग्रस्तांना दोन वेळचा नाष्टा, जेवण, तसेच सर्व जनावरांना चारा दिला जात आहे. यापूर्वीच्या २००५ व २०१९ मधील महापुरात देखील कारखान्याने छावणी उभारून मदत केल्याची माहिती यावेळी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी दिली. दरम्यान, मंत्री पाटील यांनी घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, अकिवाट या भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी, तसेच कन्या शाळा व कारखान्यावरील चारा छावणीला भेट देऊन पाहणी केली.
सध्या मदतकार्यावर भर, पूर ओसरल्यावर नुकसानीचे पंचनामे
यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना वेळेत चहा, नाष्टा, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशुवैद्यकीय सेवा दिली जातेय का, याची विचारणा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन आपल्या सोबत आहे. सध्या मदतकार्यावर भर आहे. पूर ओसरल्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
---
गुुरुदत्त पाहणी
ओळ : पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीत स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भेटून त्यांची आस्थेने चौकशी केली.
----