वरणगेतील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:54+5:302021-09-04T04:27:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रयाग चिखली : वरणगे येथे महापुराचे पाणी घरांमध्ये शिरून नुकसान झालेल्या पूरग्रस्त यादीतील लाभार्थींना नुकसानभरपाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रयाग चिखली : वरणगे येथे महापुराचे पाणी घरांमध्ये शिरून नुकसान झालेल्या पूरग्रस्त यादीतील लाभार्थींना नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडमार्फत तहसीलदारांना देण्यात आले.
वरणगे गावात महापुरावेळी घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच शेकडो लोकांना स्थलांतर करावे लागले. घर, घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरबाधित घरांचा पंचनामा करून यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली, पण काही लोकांची नावे यादीत नसल्यामुळे त्यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे लाभार्थी यादीमध्ये असणाऱ्या पूरग्रस्त कुटुंबांची मदत थांबविण्यात आली आहे. महापूर ओसरून एक महिना झाला आहे. तसेच इतर गावांना नुकसानभरपाईची मदत मिळालेली आहे, पण वरणगेतील पूरग्रस्तांना ही मदत अजूनही मिळालेली नाही. ज्यांची नावे पूरग्रस्त यादीमध्ये नाहीत, त्यांची नावे पूरग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करण्याला आमची कोणतीही हरकत नाही. पण ज्यांची नावे पूरग्रस्त यादीमध्ये आहेत, त्या कुटुंबांना तत्काळ पूरग्रस्त नुकसानभरपाईची मदत मिळावी, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडमार्फत देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे करवीर तालुका कार्याध्यक्ष राहुल पाटील, बबन पाटील, अविनाश आंबी, विकी पाटील, संतोष पाटील, धोंडीराम पाटील उपस्थित होते.
# कोट# वरणगेतील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी अन्यथा या लोकांसमोर रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही. - राहुल पाटील, कार्याध्यक्ष, करवीर तालुका संभाजी ब्रिगेड.