Kolhapur News: नृसिंहवाडीत दत्तमंदिरात पाणी, प्रतिक्षा दक्षिणद्वार सोहळ्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:06 PM2023-07-21T13:06:07+5:302023-07-21T13:32:04+5:30
तीन बंधारे पाण्याखाली
रमेश सुतार
गणेशवाडी : धरण पाणलोटक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गुरुवारी दिवसभरात आठ फुटांनी वाढ झाली आहे. यामुळे नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात पाणी आले आहे.
मात्र संथगतीने पाणी पातळीत वाढ होत असल्याने अद्याप दक्षिणदार सोहळा झाला नाही. आणखीन दोन फूट पाणी पातळीत वाढ झाल्यास दक्षिणदार सोहळा संपन्न होणार आहे. दक्षिणदार सोहळ्यांचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविक काल, गुरूवार रात्री पासूनच नृसिंहवाडीत दाखल झाले आहेत. मात्र पाणी पातळीत संथगतीने वाढ झाल्याने आज दिवसभर दक्षिणदार सोहळयास हुलकावणी दिली आहे.
दत्तमंदिरात पाणी आल्याने दत्त देवस्थानच्या वतीने मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. अधिकमास गुरुवार असल्याने दत्तदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थानच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
तीन बंधारे पाण्याखाली
यापूर्वी शिरोळ तालुक्यातील तेरवाड, राजापूर व शिरोळ हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असून, गुरुवारी दूधगंगा नदीवरील दत्तवाड-मलिकवाड, घोसरवाड-सदलगा, दत्तवाड-एकसंबा हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे शेतीकामाला वेग आला आहे. तर दुसऱ्या बाजूला नदीवरील विद्युत मोटरी काढण्यात शेतकरी गुंतला आहे.