Kolhapur Flood: महापुराचे पाणी शहरात शिरले, नागरिकांचे धाबे दणाणले; निवारा केंद्रे कुठे..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 03:55 PM2024-07-27T15:55:53+5:302024-07-27T15:58:43+5:30
२३८ नागरिकांचे स्थलांतर
कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात पावसाचा जोर कमी अधिक असला, तरी महापुराची परिस्थिती मात्र गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पातळी जशी ४५ फुटांवर गेली, तसे पूरक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील शाहूपुरी कुंभारगल्ली, सुतारवाडा, बापट कॅम्प, शुक्रवारपेठ, व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी परिसरातील घरातून पाणी शिरायला लागल्यानंतर त्या परिसरातील २३८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
राधानगरी धरणक्षेत्रात कोसळत असलेला संततधार पाऊस, राधानगरी धरणाचे सहा दरवाजे खुले झाले आहेत, तसेच तुळशी धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची पातळी ४४ फूट ६ इंच इतकी होती. ती सायंकाळी ६ वाजता ४५ फूट ८ इंच इतकी झाली. केवळ १२ तासांत १ फूट २ इंचने वाढली.
शुक्रवार पहाटेपासूनच पंचगंगा नदी, तसेच जयंती नाल्याचे पाणी नागरी वस्तीत शिरायला सुरुवात झाली. शाहूपुरी कुंभार गल्लीत सर्वप्रथम पाणी शिरले. त्यानंतर व्हिनस कॉर्नर, दिप्ती अपार्टमेंट, लक्ष्मीपुरी, पोलोग्राउंड, माळी मळा, रमणमळा, विन्स हॉस्पिटल, शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठ, आखरी रास्ता, पंचगंगा तालीम मंडळ परिसर, विश्वकर्मा परिसर, नागाळापार्क रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र परिसर, महावीर उद्यान परिसर, पुण्यनगरी, लोकनगरी आदी परिसरांत पाणी शिरले. त्यामुळे त्या परिसरांतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी राहत्या घरातून बाहेर पडून सुरक्षित स्थळी जाण्याची लगबग दिवसभर सुरू होती.
नागरी वस्तीत पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानंतर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन, तसेच अग्निशमन दलाचेही काम वाढले. पालिकेचे कर्मचारी, तसेच जवान पुन्हा एकदा पूरक्षेत्रात जाऊन नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करत होते. काहींनी या आवाहनास प्रतिसाद दिला, तर काही जण आम्ही वरील मजल्यावर जाऊन थांबतो, असे सांगून त्याकडे दुर्लक्ष करत राहिले. पेंढारकर सांस्कृतिक केंद्राजवळून तीन कुटुंबांना जवानांनी तेथून स्थलांतर केले. त्यामध्ये वयस्कर, तसेच लहान मुलांचा समावेश आहे.
शाहू छत्रपती, सतेज पाटील यांच्याकडून पाहणी
शुक्रवारी खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, राजेश पी. पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापूर शहर, तसेच आंबेवाडी परिसरात भेट देऊन महापुराची पाहणी केली. पूरग्रस्तांशी चर्चा केली.
पालकमंत्र्यांकडून आढावा
शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात पोहचलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला, तसेच त्यांनी चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केली.
सामानाची आवरा आवर सुरूच
महापुराची परिस्थिती अधिक गंभीर होईल, तसे पूरक्षेत्रातील नागरिकांनी सामानाची बांधाबांध करून ठेवण्यास सुरुवात केली. सकाळपासून नागरिकांची ही लगबग सुरू होती. काहींनी आपले सामान वरील मजल्यावर नेऊन ठेवले आहे.
निवारा केंद्रातील नागरिकांची संख्या
चित्रदुर्ग मठ - ११३
मुस्लीम बोर्डिंग - २
ग. गो. जाधव - ५०.
तात्यासाहेब मोहिते विद्यालय शाहूपुरी - २३.
संत गोरा कुंभार वसाहत बापट कॅम्प - ५० नागरिक.
कोल्हापूर शहरातील पाणी आलेले ठिकाण
१. लक्षतीर्थ वसाहत आयडियल कॉलनी.
२. गायकवाड वाडा पंचगंगा तालीम रोड बंद.
३. सुतार वाडा, सीता कॉलनी सीपीआर चौक.
४. खानविलकर पेट्रोल पंपाची बॅक साइड विश्वकर्मा अपार्टमेंटच्या पिछाडीस, विंग्स हॉस्पिटल समोर.
५. पोलो ग्राउंड रमणमळा पॅलेस ऑर्चिड अपार्टमेंट परिसर पाण्यामध्ये, माळी मळा.
६. जावडेकर पिछाडीस.
७. रेणुका मंदिरच्या पिछाडी ग्रहयोग अपार्टमेंटच्या बॅक साइडला.
८. उलपे मळा, शिये नाका रस्ता बंद.
९. मलयगिरी मुक्त सैनिक वसाहत, सफायर पार्क कदमवाडी, बापट कॅम्प स्मशानभूमी, जाधव वाडी ते कदमवाडी रस्ता पाण्यामध्ये बंद.
१०. वीट भट्टी कामगार वस्ती, तावडे हॉटेल परिसर.