महापुरात बुडालेल्या गल्ल्या पुन्हा गजबजल्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:29 PM2021-07-29T13:29:06+5:302021-07-29T13:32:02+5:30
Flood Kolhapur : शंभर टक्के महापुरात बुडालेली आंबेवाडी, चिखली पंचगंगेचे पाणी ओसरू लागल्यानंतर वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. ग्रामस्थ महापुराच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर खेळवतच मोडलेला संसार पुन्हा एकदा उभा करण्यात गुंतले आहेत. स्वच्छतेची कामे युध्दपातळीवर सुरू असून घर, अंगण, रस्तेही वेगाने गाळमुक्त होत आहेत. आता घरी परतलेल्या ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे ती मदतीची आणि पंचनामे सुरू होण्याची.
नसिम सनदी
कोल्हापूर : शंभर टक्के महापुरात बुडालेली आंबेवाडी, चिखली पंचगंगेचे पाणी ओसरू लागल्यानंतर वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. ग्रामस्थ महापुराच्या खाणाखुणा अंगाखांद्यावर खेळवतच मोडलेला संसार पुन्हा एकदा उभा करण्यात गुंतले आहेत. स्वच्छतेची कामे युध्दपातळीवर सुरू असून घर, अंगण, रस्तेही वेगाने गाळमुक्त होत आहेत. आता घरी परतलेल्या ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे ती मदतीची आणि पंचनामे सुरू होण्याची.
२०१९ ला अनपेक्षितपणे आलेल्या महापुराने पंचगंगा नदीला खेटून असलेल्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली ग्रामस्थांची दाणादाण उडवली. एका क्षणात होत्याचे नव्हते केले. यावर्षीदेखील त्याची पुनरावृत्ती होईल, अशी शंका होती, पण महापुराचे पाणी दीड फुटाने जास्त आले तरीदेखील २०१९ ची भयावहता मात्र दिसली नाही, हे विशेष. लोक सावध झाले, पुराची कमाल रेषेची आधीच कल्पना असल्याने बऱ्यापैकी हानी टाळता आली, पण जे बेसावध राहिले किंवा काही सोयच नव्हती, पाणी वेगाने वाढल्याने बाहेर पडायला वेळ मिळाला नाही, अशांचे प्रापंचिक साहित्यासह इतर नुकसानही मोठ्याप्रमाणावर झाले आहे. आता पूर ओसरल्यानंतर घरी आल्यावर हे नुकसान झालेले असतानाही पुन्हा नव्या उमेदीने ग्रामस्थ कामात गुंतले आहेत.
स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता
आंबेवाडी आणि चिखलीत फिरताना जागोजागी अजूनही कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. जगदगुरू मठ व नानीज संस्थानच्या ५०० महिला-पुरुषांचा समावेश असलेला समन्वयकांचा गट या दोन गावांत कचरा उचलून गाव स्वच्छ करण्याच्या कामात गुंतला आहे. अमित लाड त्यांचे नेतृत्व करत आहेत.
सरनाईक बंधूंचे संगीत पाण्यात
चिखलीमध्ये कच्च्या दगड-मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यात कृष्णात व विष्णू सरनाईक यांच्या दुमजली घराचा ढिगारा झाला आहे. ते स्टार ऑर्केस्ट्रा चालवत होते. पूर येणार म्हणून सर्व सामान माडीवर ठेवले आणि जनावरांसह घर सोडले. महापुरात हे घर पूर्णपणे कोसळले. प्रापंचिक साहित्य, धान्य, वाहने ढिगाऱ्याखाली अडकली, पण तब्बल १० लाखांचे साहित्य पाण्यात बुडाल्याने सरनाईक बंधूंवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्पीकर देखील वाहून गेले आहेत.
स्वप्नांचा चिखल
आंबेवाडीतील प्रिया पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी शिलाईचे दुकान सुरू केले. कोरोनामुळे ते तसे चालले नाही, तोपर्यंत आलेल्या पुराने सर्व मशीन चिखलात रुतली आहे. जणू काही त्यांच्या स्वप्नाचाच चिखल झाला आहे, पण तरीदेखील त्या सावरण्यात, स्वच्छतेत गुंतल्या आहेत.