महापूर ठरलेला...मग शेती पिकवायची की नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:27 AM2021-08-19T04:27:16+5:302021-08-19T04:27:16+5:30
संदीप बावचे शिरोळ : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आला आहे. असा प्रत्येक ...
संदीप बावचे
शिरोळ :
अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आला आहे. असा प्रत्येक वर्षाला महापूर येणार असेल, तर आम्ही शेती पिकवायची की नाही, असा प्रश्न शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे. यंदा महापुरामुळे सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रातील तीस कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापुरामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक पध्दतीत बदल करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. सध्या पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांना शासनाकडून विशेष पॅकेज देण्याची गरज आहे. २०१९ च्या महापुरानंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नद्यांच्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात हाहाकार माजला. बघता-बघता ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, फूलशेती, केळी यासह अन्य पिके पाण्याखाली गेली. तीन दिवसांच्या अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारा शेतकरी महापुरामुळे खचला आहे. उभी पिके पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. पूर ओसरल्यानंतर पिकांचा पालापाचोळा दिसत आहे. कुजलेली पिके शेतातून बाहेर काढली जात आहेत. शेतीचे भकास चित्र दिसू लागले आहे. कुजलेल्या पिकांची विल्हेवाट लावणे हे एक आव्हानच ठरत आहे. ज्या जमिनीवर सतत आठ-दहा दिवस पाणी साचून राहिले त्या जमिनीतील जिवाणू मरुन गेले आहेत. त्याचे पुन्हा संवर्धन करणे शिवाय पीकवाढीवर होणारे परिणामदेखील शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहेत. पिकांमध्ये केलेली गुंतवणूक वाया गेली आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी संघर्ष समित्यांचा एल्गार सुरू आहे. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी अनेक आश्वासने सरकारने दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे.
फोटो : १८ शिरोळ महापूर
शिरोळ तालुक्यात महापुराने खराब झालेले सोयाबीन पीक शेतकरी कापून टाकत आहेत. (छाया- सुभाष गुरव, शिरोळ)