कोल्हापुरातील पूर ओसरला; अद्याप २३ बंधारे पाण्याखाली, पडझडीत लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:24 PM2023-08-02T14:24:58+5:302023-08-02T14:25:33+5:30
पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे बंद झालेले तीन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले होते. मात्र, दुपारी चार वाजता एक दरवाजा बंद झाल्याने त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात दोन फुटाने कमी झाल्याने पुराचे पाणी हळूहळू पात्रात जाऊ लागले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड व चंदगड तालुक्यात तुलनेत पाऊस अधिक आहे. गेले दोन दिवस पाऊस कमी राहिल्याने धरणातील विसर्ग कमी झाला होता.
‘राधानगरी’चे सहा दरवाजे बंद झाले होते. मात्र, मंळवारी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस कोसळत राहिल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. या धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट, तर वारणा धरणातून ५९७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी ३१.९ फुटांवर असून अद्याप २३ बंधारे पाण्याखाली आहेत. दोन राज्य व एक प्रमुख जिल्हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहे.
पडझडीत ८.४० लाखांचे नुकसान
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत २१ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामुळे ८ लाख ४० हजारांचे नुकसान झाले आहे.