कोल्हापुरात महापूर; धो-धो पाऊस; ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:58+5:302021-07-24T04:15:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरूच असून विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरूच असून विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती २०१९ पेक्षाही गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचाही संपर्क तुटला आहे. पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली (ता. हातकणंगले) येथे महापुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर शहराचा संपर्क तुटला आहे.
कोल्हापूरजवळच्या राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची ४३ फूट पाणी पातळी धोक्याचा इशारा मानली जाते. गुरुवारी रात्री १२ वाजता ही पातळी गाठली गेली होती. तर शुक्रवारी सायंकाळी ही पातळी ५४ फुटांपर्यंत गेली होती. जिल्ह्यातील १२५ हून अधिक बंधाऱ्यांवर पाणी आले असून ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणी शिरल्याने हे कार्यालय जिल्हा परिषदेत हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही राधानगरीसह अन्य काही धरणांचे दरवाजे उघडलेले नाहीत. ते उघडल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे.
कोल्हापुरात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्येही पाणी गेले असून तेथील रुग्ण हलवताना नातेवाईक, कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. भुदरगड तालुक्यातील पांगिरे येथील पुलावर अडकलेल्या ट्रव्ह्लरमधून................. ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. तर कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील कर्नाटकच्या बसमधून १५ हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली. एनडीआरएफच्या दोन टीम गुरुवारी तर एक टीम शुक्रवारी दाखल झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पूर आणि भरलेला रंकाळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने अनेक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अखेर केवळ शासकीय वाहने आणि आपत्कालीन यंत्रणेतील वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
--------------------------------
सांगलीत ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटला, कृष्णा, वारणेला पूर
सांगली : जिल्ह्याला शुक्रवारी दिवसभर पावसाने झोडपले. सांगली शहरासह पश्चिम भागातील गावांना पुराचा तडाखा बसला. सांगलीत कृष्णेचे पाणी संध्याकाळपर्यंत पात्रातच होते, पण ४० हून अधिक गावांचा संपर्क मात्र तुटला होता.
चिकुर्डेसह काही ठिकाणी जनावरे पुरात वाहून गेली. डिग्रज, मौजे डिग्रजचा, ब्रह्मनाळ गावांचा संपर्क तुटला. पुराची शक्यता पाहून सांगली एसटी आगारातील ९८ बसेस तासगाव, इस्लामपूर, मिरज व चंदनवाडी कार्यशाळेत हलवण्यात आल्या. भिलवडीमध्ये बाजारपेठेत पाणी शिरले होते. सुखवाडी, चोपडेवाडी, भुवनेश्वरवाडीचा संपर्क सकाळीच तुटला. मांगले परिसरात महापुराने २००५ व २०१९ चे विक्रम मोडले आहेत. वाळव्यात कणेगाव व भरतवाडीत नागरिकांनी जनावरांसह गाव सोडले. चांदोलीत २४ तासांत ५७४ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनच्या २४ तासांत तब्बल ५७४ मिलिमीटर पाऊस कोसळला. धरणातील पाणीपातळी सव्वापाच मीटरने वाढली. पाणीसाठा १३.५ टीएमसीने वाढला. त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत भर पडली. सांगलीत आयर्विन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजता कृष्णेची पाणीपातळी ३८ फूट होती, दुपारी दोनपर्यंत ती ४३ फुटांपर्यंत गेली. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, शिवशंभो चौक, जुना बुधगाव रस्ता आदी भागांत पाणी शिरले. कृष्णेची पाणीपातळी ५२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली. या पातळीला सांगली शहराला महापुराचा फटका बसतो, त्यामुळे प्रमुख बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करायला सकाळपासूनच सुरुवात केली होती.
--------------------------------
सातारा जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासात नवजा येथे ७४६ तर कोयना येथे ६१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कऱ्हाड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे.