महापूर ओसरला.. दुबार पीक कोणते घ्यायचे याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:49+5:302021-08-15T04:25:49+5:30

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महापुराने खरीप हंगामातील पिकांची पुरती वाट लागली. आता यापुढे काय पीक घेता ...

The floodwaters receded | महापूर ओसरला.. दुबार पीक कोणते घ्यायचे याची चिंता

महापूर ओसरला.. दुबार पीक कोणते घ्यायचे याची चिंता

Next

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : महापुराने खरीप हंगामातील पिकांची पुरती वाट लागली. आता यापुढे काय पीक घेता येईल याची चर्चा शेतकरी करू लागला. विशेष म्हणजे याबाबतीत कृषी विभागाकडे मार्गदर्शक सूचनांची वानवाच आहे. पंचनामे करायच्या नादात पीक कोणते घ्यायचे याचे मार्गदर्शन प्रभावी करणे मुश्कील झाले आहे. तरीसुद्धा मूग,सोयाबीन,मका ही पिके घेण्याचाच पर्याय समोर दिसत आहे.त्यामुळे कडधान्य हाच उत्पन्नाचा थोडा आधार बनण्याची शक्यता आहे. हातकणंगले तालुक्यात सुमारे २७७५ हेक्टर क्षेत्रावर असा प्रयोग होऊ शकतो. तर दोन हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागण करता येऊ शकते, असे कृषी विभागाचा कयास आहे.

शेती ही हवामानावर अवलंबून आहे.योग्य वेळी योग्य पाऊस झाला तर पिकाचे उत्पादन भरघोस येते.पण जुलैमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर आला. हातकणंगले तालुक्यातील ११ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. खरीप हंगामातील पिके यामुळे उद‌्ध्वस्त झाली. सर्वाधिक उसाचे क्षेत्र बाधित झाले. सोयाबीन,भुईमूग पिकाचे अस्तित्वच नाहिसे झाले.

पूर ओसरल्यानंतर झालेल्या पिकांच्या नुकसानीचे चित्र पाहून हबकला. शासन काय मदत करणार या चिंतेत व्यस्त झाला. पण अजूनही पंचनामेच सुरू आहेत. भरपाईची नेमकी आकडेवारी सांगता येत नाही. चिंताग्रस्त अवस्थेतच तो आगामी कालखंडासाठी काय पीक घेता येईल.याची विचारपूस शेतकरी करू लागला आहे.पण ठोस माहिती मिळणे अवघड झाले आहे.

हातकणंगले तालुक्यात महापूर व अतिवृष्टीने सुमारे चाळीस गावातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये १ हजार ५०० हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. भुईमुगाचे १ हजार२७५ हेक्टर क्षेत्र आहे. म्हणजे या दोन्ही क्षेत्रात आता कमी कालावधीचे उडीद,मूग,मका(आफ्रिकन स्टॉल)ही कमी कालावधीत येणारी पिके घेता येणे शक्य असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.ही पिके साठ दिवसांची आहेत. पण खर्चिक असून उत्पन्नदानाची हमी नाही.धाडसाने काही ठिकाणी शेतकरी हा प्रयोग करू पाहत आहेत. सोयाबीनही टोकण्याचे धाडस होताना दिसत आहे.

उसाचे बाधित क्षेत्र आठ हजार हेक्टर आहे.यापैकी दोन महिन्यांपूर्वी लागण केलेल्या उसाचे दीड हजार क्षेत्र समाविष्ट आहे.या क्षेत्रात पुन्हा उसाच्या रोपाची लागण करता येणे शक्य असल्याचे कृषी विभागाचे मत आहे.

पण शासनाचा कृषी विभाकडे अजूनही महापुरानंतर पिके घेता येतील काय?यासंदर्भात कसल्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःच्या अभ्यासानुसार पीक घेता येते का या तयारीत आहे.

Web Title: The floodwaters receded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.