साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर फुलली वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:21+5:302021-06-05T04:17:21+5:30
कोल्हापूर : साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग शिवाजी विद्यापीठात झाला आहे. कमी खर्चात नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपण ...
कोल्हापूर : साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग शिवाजी विद्यापीठात झाला आहे. कमी खर्चात नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाला बळ देण्याचे काम या प्रयोगातून झाले आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांची त्यांच्या वाणानुसार १७ ते १८ फुटांपर्यंत वाढ झाली आहे.
दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र, या रोपणाच्या प्रमाणात झाडे वाढताना दिसत नाहीत. हे लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठामध्ये सन २०१३ मध्ये प्रयोगात्मक वृक्ष लागवड करण्याचा तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी निर्णय घेतला. या प्रयोगाची जबाबदारी उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्यावर सोपविली. त्यांनी उद्यान अधीक्षक बाबा कदम आणि कर्मचाऱ्यांच्या साथीने काम सुरू केले. या सर्वांनी या वृक्षारोपणासाठी खडकाळ, माळरान आणि एकही झाड नसलेल्या दूरशिक्षण केंद्रापासून प्रवेशद्वार क्रमांक सहाकडे जाणाऱ्या रस्त्यामधील त्रिकोणी माळ निवडला. या परिसरात खोल खड्डे काढून त्यातील मुरूम, माती मोकळी केली. पाऊस पडेपर्यंत हे खड्डे तसेच ठेवले. या माळावरील मुरमाड जमिनीवर साग, लाल भुगा मुरूम असणाऱ्या जमिनीवर चिंच, करंज, कडुनिंब आणि जांभूळ, तर कडक मुरूम असणाऱ्या जमिनीवर शिसमची झाडे लावली. त्यांची उंची एक फुटापेक्षा कमी होती. एकूण साडेआठ एकराच्या परिसरामध्ये एक हजार झाडे लावली. दोन झाडांमध्ये मोठे अंतर ठेवले. खड्डे खोदणे, वृक्ष लागवड आणि पहिल्या वर्षी बुंध्यातील माती हलवणे या तीन कामासाठीच काय तो खर्च आला. खड्डे भरण्यासाठी तीच माती किंवा मुरूम वापरल्याने पावसाळा संपल्यानंतर झाडांच्या खड्ड्यात भेगा पडलेल्या आढळल्या नाहीत. पावसाळा संपण्यापूर्वीच या झाडांच्या बुंध्यातील माती हलवली असल्याने भेगा पडल्या नाहीत किंवा त्या वाढल्या नाहीत. उष्ण हवेचा मुळांशी संपर्क होणे टळले. त्यामुळे झाडांचे जगण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिले.
चौकट
नैसर्गिक संसाधनांनी झाडे वाढविली
लहानपणापासून झाडे लावण्याची पाहिलेली पद्धत आणि वृक्ष लागवडीसाठी सांगण्यात येणारी पद्धत वेगळी असल्याने जरा वेगळा प्रयोग करण्याचे आम्ही ठरवले. नैसर्गिक संसाधनाचा वापर करून कमी खर्चात केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान वाटते, असे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले. उन्हाळा सुरू झाल्यानंतर केवळ त्या झाडांच्या बुंध्यांमध्ये भेगा पडणार नाहीत, याची दक्षता घेतली. या झाडांना गेल्या आठ वर्षांत एकदाही पाणी घातलेले नाही. त्यांना नैसर्गिक संसाधनासह वाढू दिले. झाडांची वाढ हळू होत होती. मात्र झाडांचे मरण्याचे प्रमाण अगदी कमी होते. काही वनस्पती खडकाळ जागी उगवणाऱ्या, त्याही पूर्वीप्रमाणेच येत आहेत. त्यामुळे जैवविविधता अबाधित राहिली. येथे लावलेल्या रोपांतील ९० टक्के रोपांचे वृक्षात रूपांतर झाले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे.
===Photopath===
040621\04kol_3_04062021_5.jpg~040621\04kol_4_04062021_5.jpg~040621\04kol_5_04062021_5.jpg
===Caption===
फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे.~फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे.~फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे.