महामूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
By admin | Published: February 5, 2015 12:06 AM2015-02-05T00:06:22+5:302015-02-05T00:13:20+5:30
महामस्तकाभिषेकाची सांगता : णमोकार मंत्र व बाहुबली भगवानांचा एकच जयजयकार
बाहुबली : येथील १००८ भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेकप्रसंगी भगवान बाहुबली महामूर्तीवर व पहाडावरील त्रिकूट मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी चोहोबाजूंनी णमोकार मंत्र व बाहुबली भगवानांच्या जयजयकाराचा एकच जल्लोष झाला; तर सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव व मंगल महाआरतीने महामस्तकाभिषेकाची सांगता झाली.भगवान बाहुबली महामूर्ती महामस्तकाभिषेकाच्या तिसऱ्या दिवशी महामूर्तीच्या चरणाभिषेकचा मान अशोक कल्लाप्पा कोंडे, सुरेखा कोंडे यांना मिळाला. पूजा-विधान मंडपाचे ध्वजारोहण श्रीपाल कटारिया (जयपूर) यांनी केले. विधान मंडपाचे उद्घाटन सुदीन खोत (पुणे) यांनी केले. मंगल कलशस्थापना सनतकुमार आरवाडे (सांगली) यांच्या हस्ते झाली. दीपप्रज्वलन गुरुकुलचे स्नातक आप्पासाहेब भगाटे यांनी केले.३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी अखेर सुरू असलेल्या महोत्सवामध्ये दि. २, ३ व ४ फेब्रुवारी या दिवशी महामूर्तीचा मस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी जलाभिषेकाचा मान वीरेंद्र दिलीप पंचवाटकर, अष्टगंधाभिषेक : सुरेश पाटील (सांगली), दुग्धाभिषेक : अण्णासाहेब शेंडुरे (हुपरी), कुंकुमाभिषेक : महावीर हिरालाल दोशी, दही अभिषेक : तात्या अथणे, पीतकुंभाभिषेक : चंद्रशेखर समाने, सर्वोवषधी अभिषेक : महावीर पाटील यांच्यासह हजारो भाविकांनी मस्तकाभिषेक केला.पंचपरमेष्ठी कलश, रत्नत्रय कलश, रत्नकलश, अमृतकलश, सुवर्णकलश, रजतकलश व पद्मकलशांनी मानकऱ्यांनी मस्तकाभिषेक केले. याप्रसंगी लाखो भाविक मंदिर परिसर, शाळेची इमारत, डोंगरावरील गुरुकुलच्या छतावर, झाडावर बसून अभिषेक पाहात होते. महामूर्तीवर व पहाडावरील त्रिकूट मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर सायंकाळी वीरसेवा दलाचे झांजपथक, बॅन्ड व णमोकार मंत्राच्या जयजयकारात भव्य रथोत्सव काढण्यात आला. रथात बसण्याचा मान अभिषेक दादासोा पाटील यांना मिळाला. तर रात्री मंदिर परिसरामध्ये हजारो श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत सामुदायिक मंगलआरती करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून गेला. संपूर्ण पूजा विधी-विधान पू. १०८ वर्धमान सागर महाराज, श्रीभद्र महाराज, आर्यिका ज्ञानमती माताजी, आर्यिका लक्ष्मीमनी माताजी व क्षुल्लक समर्पणसागर महाराजांच्या उपस्थितीत होत आहे. तर विधी-विधान क्रिया सुशीलकुमार उपाध्ये, महावीर शास्त्री, पं. सम्मेद उपाध्ये यांनी केली. (वार्ताहर)
परिसरात भक्तीमय वातावरण
कुंभोज : बाहुबली (ता. हातकणंगले) येथील महामस्तकाभिषेक सोहळ््याच्या निमित्ताने कुंभोज पंचक्रोशीतील जैन बांधवांत चैतन्य पसरले आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या डोळ््याचे पारणे फेडणाऱ्या भक्तीमय सोहळ््यात महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील लाखो भाविक पवित्र वातावरणात न्हाऊन निघत आहेत.
दर बारा वर्षांनी होणाऱ्या महामस्तकाभिषेक सोहळ््याचे नेटके संयोजन, दर्जेदार सुविधा, भक्तीमय तसेच देखण्या परिसरानेयुक्त करणेत आलेल्या वातावरण निर्मितीने इथे दखल होणारा प्रत्येक भाविक भक्तीमय वातावरणात रमून जात आहे.
केवळ जैन धर्मीयच नव्हेत, तर जैनेतर समाजातील अबालवृद्धांची सोहळ््यातील उपस्थिती लक्षणीय आहे. रोज विविध विषयांवरील प्रबोधनपर व्याख्याने, सवालधारकांची मिरवणूक, विविध धार्मिक विधी, भोजन, सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रमलेले हजारो भाविक प्रसन्न झाले आहेत. कुंभोज, नरंदे, हिंगणगाव, दानोळी, मजले, आळते या पंचक्रोशीतील जैन बांधवांच्या घरी सोहळ््यादरम्यान नातेवाईक तसेच हातकणंगले ते बाहुबली तसेच बाहुबली ते कुंभोज, पेठवडगाव मार्गावर वाहनांची रीघ लागली. मुले शाळेतून सवलत घेऊन पालकांसोबत गेले पाच दिवस बाहुबलीच्याच वाटेवर आहेत. (वार्ताहर)
रवींद्र जैन यांना समाजभूषण
महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांनी धार्मिक गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या महोत्सव समारंभाचे औचित्य साधून जैन यांना महामस्तकाभिषेक समिती व बाहुबली संस्थेमार्फत ‘समाजभूषण’ हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमास क्षुल्लक समर्पणसागर महाराज, राजू शेट्टी, अरविंद दोशी, सनतकुमार आरवाडे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कार्याध्यक्ष डी. सी. पाटील, सहकार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, विजय बेळंकी, प्रकाश आवाडे, उत्तम आवाडे, बी. टी. बेडगे, डी. ए. पाटील, कलगोंडा पाटील, अनिल भोकरे, वीर सेवा दल, वीर महिला मंडळाचे कार्यकर्ते, महोत्सव समितीचे पदाधिकारी, स्नातक, अध्यापक उपस्थित होते.