विधायक कार्याची फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:22 AM2018-09-17T01:22:11+5:302018-09-17T01:22:17+5:30
साऊंड सिस्टीमचा घुमणारा आवाज, ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, मंडपासमोर विविध स्वरूपांतील हिंदी, मराठी गीतांवर नृत्याचा रंगलेला फेर आणि विसर्जन मिरवणुकीतील निव्वळ ईर्ष्या आणि दंगा इतकेच कोल्हापुरात गणेशोत्सवाचे चित्र नाही. हा उत्सव निव्वळ ‘एंजॉय’ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत काही सामाजिक उपक्रमांसाठी राबणाºया मंडळांचे कार्यकर्तेही आहेत. आपली नोकरी, व्यवसाय, शिक्षण सांभाळून असे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपापल्या मंडळांच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवीत आहेत. त्यामध्ये शिवाजी पेठेतील श्री राजे संभाजी तरुण मंडळाने पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा गेल्या २८ वर्षांपासून जोपासली आहे. विद्यार्थी कामगार मंडळातर्फे पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी सव्वाचार फुटांच्या फायबरच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले जाते. टेंबलाईवाडी येथील समर्थ कॉलनीतील श्री समर्थ तरुण मंडळाने गणेशोत्सवात जमा झालेल्या वर्गणीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आपल्या कॉलनीच्या परिसरात सुरक्षितता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. डोर्ले कॉर्नर येथील ‘डी-९८’ हिंदुस्थान प्रणित बाजार ग्रुप या मंडळाने महाप्रसाद बंद करून गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार, औषधांसाठी मदतीचा उपक्रम सुरू केला आहे. शिवाजी पेठेतील हिंदवी स्पोर्टस्ने गरजू रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळ हे धार्मिक कार्याला समाजसेवेची जोड देण्यात यशस्वी ठरले आहे. या मंडळातर्फे विद्यार्थ्यांना वर्षभर पुस्तके वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर, गरजूंना रक्तपुरवठा, महापूर-दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. शाहूकालीन परंपरा असलेल्या श्री तुकाराम माळी तालीम मंडळाने गणेशोत्सवासह शिक्षण, आरोग्य, आदी क्षेत्रांत सामाजिक कार्याचा वसा जोपासला आहे. राजारामपुरी दुसºया गल्लीतील शिवाजी तरुण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. शिवाजी उद्यमनगरातील जय शिवराय मित्रमंडळाने स्थापनेपासून गणेशोत्सवासाठी लागणाºया मंडपासाठी रस्त्यावर एकही खड्डा मारलेला नाही. जुना बुधवार पेठेतील श्री शिपुगडे तालीम मंडळाकडून गेल्या ३० वर्षांपासून लोकवर्गणी न मागता फक्त कार्यकर्त्यांकडूनच वर्गणी घेतली जाते. डांगे गल्ली तरुण मंडळाने वर्गणीला फाटा देऊन ‘वर्गणी नको, स्क्रॅप द्या’ असे आवाहन केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालेल्या या स्क्रॅपच्या माध्यमातून जमलेल्या वर्गणीतून शहर आणि जिल्ह्णातील गरजू सामाजिक संस्थांना मदत केली जाते. ‘२१ फुटी ‘महागणपती’चे मंडळ’ अशी ओळख असणाºया शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे, लोककला असणाºया, सोंगी भजन करणाºया कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नवरात्र उत्सवामध्ये सोंगी भजन स्पर्धा घेतली जाते. वडगणे (ता. करवीर) येथील शिवसाई तरुण मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. या मंडळांसह शहर आणि ग्रामीण भागांतील काही मंडळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. आपल्या देखाव्यांतून सामाजिक प्रबोधन करतात. लहान-मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून काही मंडळे आपल्या लाडक्या गणरायाच्या चरणी सामाजिक आणि विधायक कार्यांची फुले वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण मंडळांच्या तुलनेत असे विधायक उपक्रम राबविणाºया मंडळाची संख्या तुलनेत कमी आहे. मात्र, ही मंडळे आपल्या विधायक उपक्रमांतून महत्त्वपूर्ण असे सामाजिक कार्य करीत आहेत. विधायक उपक्रम राबविणाºया मंडळांचे कार्य अन्य मंडळांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या दृष्टीने प्रबोधन करण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. गणेशोत्सवातील आर्थिक उलाढाल वर्षागणिक वाढत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने संघटित झालेल्या तरुणाईमध्ये मोठी ऊर्जा आणि उत्साह असतो. हा उत्सव धार्मिकतेने साजरा होऊन त्यातून समाजातील वंचित घटकांसाठी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपक्रम राबविले, तर निश्चितपणे श्री गणेशाचा उत्सव खºया अर्थाने साजरा होईल. उत्सवातून समाजप्रबोधन, सामाजिक एकतेचा उद्देश सार्थ ठरेल. त्यातून एक चांगला आणि वेगळा संदेश सर्वत्र जाईल.