पूरबाधित ऊस येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:08 PM2020-01-30T12:08:06+5:302020-01-30T15:12:59+5:30
पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला
कोल्हापूर : पूरबाधित ऊस कोणत्याही परिस्थितीत या आठवडाभरात तोडा, परराज्यांतून येणारा ऊसही पूरबुडीतच घ्या, त्यासाठीची यंत्रणा युद्धपातळीवर राबवा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी साखर कारखानदारांना दिले. यावर नियंत्रणासाठी कारखानानिहाय सहनिबंधकांची नेमणूक करावी, अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या. हा ऊस तोडावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी हे तिस-यांदा आदेश काढले आहेत. तरीही मुर्दाड कारखानदार त्याला दाद देत नाहीत असे चित्र दिसत आहे.
पूरबाधित ऊस तोडण्यासाठी कारखानदारांकडून टाळाटाळ आणि शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदार, शेतकरी संघटना या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूरबाधित ऊसतोडीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रा. एन. डी. पाटील यांनी पूरबाधित ऊस प्राधान्याने तोडावा, असे ठरलेले असतानाही वारंवार यावर बैठका घेऊन सूचना का द्याव्या लागतात, अशी विचारणा करून कारखानदारांनी शेतकºयांकडे पाहावे, आपली जबाबदारी झटकू नये. शेतकरी टिकला तरच कारखाने टिकणार आहेत; त्यामुळे ही नैतिक जबाबदारी समजून ऊस तोडून शेतक-याला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हाधिकारी देसाई यांनी अजूनही १० हजार हेक्टरवरील ऊस तुटण्याचा शिल्लक राहिला असल्याने तो प्राधान्याने तोडावा, असे सांगताना ७० : ३० हा रेशोही स्वीकारायला हरकत नाही, असे सुचविले. विशेषत: जिल्ह्यात आंतरराज्य करार असलेले कारखाने जास्त असल्याने त्यांनीही परराज्यांतून ऊस आणताना पूरबाधित ऊसच प्राधान्याने उचलावा, असे सांगितले. पूरबाधित ऊस तोडण्यासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने सहकारातील निबंधकांची यंत्रणा आठ दिवसांपुरती कामाला लावावी, असे प्रभारी साखर सहसंचालक अरुण काकडे यांना सांगितले. काकडे यांनी जातीने यात लक्ष घालावे, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
या चर्चेत इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर. के. पाटील, बाबासाहेब देवकर, सागर पाटील, आनंदा कदम, शिवाजीराव माने, मारुती पाटील, शेतकरी संघटनेचे आदिनाथ हिंगमिरे, रामचंद्र फुलारी, जनार्दन पाटील, अजित पवार यांनी सहभाग घेतला.
- अजून १० हजार हेक्टर क्षेत्र तोडीच्या प्रतीक्षेत
प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील ऊस पूरबाधित झाला होता, त्यापैकी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवरील ऊस तुटला असून, नऊ ते १० हजार हेक्टर इतकेच क्षेत्र तुटण्याचे राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
कृषी अधिकाºयांमार्फत पूरबाधित ऊसक्षेत्राची यादी
पूरबाधित गावातील पूरबुडीत ऊस उत्पादक शेतकºयांची कृषी अधिकाºयांकडून यादी तयार करून घ्या, त्यांचा ऊस तुटला आहे की नाही याबाबतची खात्री करून घ्या. त्याप्रमाणे तोडणी पत्रक करून ऊस गाळपासाठी पाठविण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाला सूचित करा, असेही आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले.