शिरोलीत उभारणार उड्डाणपूल
By admin | Published: December 27, 2014 12:32 AM2014-12-27T00:32:17+5:302014-12-27T00:34:41+5:30
अमल महाडिक : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पाठपुरावा
शिरोली : पुणे - बंगलोर महामार्गावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पादचारी उड्डाणपूल उभारण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला असून, उड्डाणपूल उभारणारच, असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.
‘लोकमत’ने शिरोली येथील ‘७९२ विद्यार्थी महामार्ग ओलांडतात रामभरोसे’ असे वृत्त आज, शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यावर आमदार महाडिक यांनी सांगितले, २००६ साली चौपदरीकरण पूर्ण होऊन वाहतुकीस हा रस्ता खुला झाला. महामार्गामुळे शिरोलीचे विभाजन झाले आहे. लोकसंख्या ४० हजारांवर असून, पैकी दहा हजारांहून अधिक नागरिक महामार्गाच्या पूर्व भागात यादववाडी, शिवाजीनगर, दत्तमंदिर परिसरात राहतात. ७९२ विद्यार्थी शाळेसाठी दररोज चारवेळा धोकादायकरीत्या महामार्ग ओलांडतात. या महामार्गावर वेगवान वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोकाही होऊ शकतो. तसेच शिरोलीच लोकांची वर्दळ असते. नागरिकांना रस्ता न ओलांडता जायचे असेल, तर शिरोली फाटा येथून जावे लागते. लांबचा रस्ता ओलांडून जाण्यापेक्षा नागरिक जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडतात. त्यामुळे पादचारी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. रस्त्याचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले होते; पण रस्ते महामंडळाने दखल घेतली नव्हती. (प्रतिनिधी)
शिरोली ग्रामपंचायतीकडून ठराव घेऊन पादचारी उड्डाणपुलाची मागणी रस्ते विकास महामंडळाकडे तसेच शासनाकडे केली आहे. याला तत्काळ मंजुरी घेऊन काम सुरू करणार आहे.
- आमदार अमल महाडिक