मुख्य बसस्थानकावर चक्का जाम
By admin | Published: August 30, 2016 12:06 AM2016-08-30T00:06:17+5:302016-08-30T00:09:50+5:30
स्वाभिमान रिक्षा संघटनेचे आंदोलन : बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्याचे आश्वासन
कोल्हापूर : शहरात वाढलेली बेकायदेशीर वाहतूक, तसेच रिक्षांचा ‘बुलाव डाव’ संदर्भात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी स्वाभिमान रिक्षाचालक - मालक संघटनेने मध्यवर्ती बसस्थानक चौकात रस्त्यावर आडव्या रिक्षा उभ्या करून चक्का जाम आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आरटीओच्या खात्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती.
यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक निरीक्षक अमित गुरव यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारून या बेकायदेशीर वाहतुकीवर आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.
कोल्हापूर शहरात वाढलेली बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, अॅपे रिक्षा, सहा सिटर रिक्षा, बुलाव डाव यासंदर्भात पोलिस खाते, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊनही संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अधिकृत रिक्षा थांबा असताना काही रिक्षाचालक या स्टॉपबाहेर रिक्षा लावून नंबरातील गाडीच्या चालकांना दमदाटी करून त्यांचे प्रवासी घेऊन जातात. त्यामुळे थांब्यावरील नंबरातील रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात कारवाई होत नसल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर व रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे यांनी सांगितले.
सुमारे अर्धा तास चक्का जाम आंदोलन केल्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. परंतु, आंदोलन मागे घेण्यात आले नाही. अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अमित गुरव हे घटनास्थळी आले. त्यांनी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर आठवड्यात नियोजन करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद वडगावकर, महेश जाधव, मधुकर दिंडे, अमोल पांढरे, सुनील कांबळे, अनिल लांबोरे, बाळू सदिगले, महादेव गायकवाड, शिवाजी पुजारी, भगवान गायकवाड, आदी रिक्षा व्यावसायिक आपल्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
वाहतुकीची कोंडी
नेहमी वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक चक्का जाम आंदोलनामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली. यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक बस गाड्या स्थानकातच थांबून राहिल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होण्यास किमान तासभर लागला.