विद्युत रोषणाईवर भर; डॉल्बीला फाटा
By admin | Published: September 14, 2016 01:19 AM2016-09-14T01:19:35+5:302016-09-14T01:19:56+5:30
पारंपरिक वाद्यांवर तरुणाई थिरकणार : विसर्जन मिरवणुकीत मंडळांची जय्यत तयारी
कोल्हापूर : कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत उद्या, गुरुवारी डॉल्बीमुक्त, प्रदूषणमुक्तचे दाट सावट दिसून येत आहे. पोलिस खात्याने डॉल्बीवर निर्बंध आणल्याने गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांची पावले पारंपरिक वाद्यांवर थिरकणार आहेत. डॉल्बीला फाटा दिल्याने अत्याधुनिक विद्युत रोषणाई, लेझर शोवर मंडळांकडून अधिक भर देत मिरवणुकीवर वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. चित्ररथ, एकाच रंगाच्या गणवेशातील कार्यकर्ते, महिलांचा अधिक सहभाग, आदी नावीन्यपूर्ण उपक्रमातून मिरवणुकीत लक्ष वेधले जाणार आहे. यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
प्रतिवर्षी विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या भिंती, अत्याधुनिक लाईट इफेक्टवर आणि गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई अक्षरश: बेधुंद होऊन नाचत राहते. डॉल्बी लावण्यासाठी मुख्य मिरवणूक मार्गावर मंडळांमध्ये जणू स्पर्धाच सुरू असते. त्यातून दोन मंडळांना वादाला सामोरे जावे लागते. त्यामुळे मिरवणूक २४ ते २५ तास चालते. यंदा मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाने डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा घातल्याने मिरवणुकीत वर्चस्व दाखविणाऱ्या मंडळांच्या दिखाऊपणावर मर्यादा आल्या.
‘तुकाराम माळी’चा
क्रीडा चित्ररथ
विसर्जन मिरवणुकीत ‘प्रथम मानाचा गणपती’ म्हणून मान मिळविणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळाने यंदा मिरवणुकीत ‘महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरा’चा चित्ररथ सहभागी करून लक्ष वेधणार आहे. कुस्तीसह विविध खेळांचे तसेच आॅलिम्पिकमध्ये पदके मिळविलेल्या खेळाडूंचे, कोल्हापुरातील गाजलेल्या मल्लांचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. सुमारे १५० हून अधिक महिला हिरव्या साड्या व पुरुष कार्यकर्ते पांढऱ्या गणवेशात मिरवणुकीत सहभागी होत आहेत.
‘पाटाकडील’चा पारंपरिक वाद्यांचा बाज
मिरवणुकीत प्रतिवर्षी छाप पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाकडून यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्यांची मोहर मिरवणुकीवर उमटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाशिकच्या ढोल-ताशासह काही पारंपरिक वाद्यांचा सहभाग तसेच त्याला गोव्यातील अत्याधुनिक विद्युत रोषणाईची साथ दिली जाणार आहे.
‘दयावान’चा वॉटर शो
शिवाजी पेठेतील दयावान गु्रपचा वॉटर स्क्रीन शो लक्षवेधी ठरणार आहे. याशिवाय अत्याधुनिक विद्युत रोषणाई, मल्टी लेसर शो, डबल एलईडी स्क्रीन, हवेतील बबल्सचे नावीन्यपूर्ण आणि नियमानुसार ध्वनियंत्रणा राहणार आहे.
‘तटाकडील’चे आसामी नृत्य
प्रतिवर्षी मिरवणुकीत उत्सुकता निर्माण करणाऱ्या तटाकडील तालीम मंडळातर्फे यंदा मिरवणुकीत आसाम राज्यातील गुवाहाटी येथील ‘सन्मान्य क्षेत्र’ या कलामंचाचे पारंपरिक नृत्य सादर केले जाणार आहे. हे नृत्य मिरवणुकीत आकर्षण ठरणार आहे. या पथकात ३० कलाकार व ५० वादक असे पथक सहभागी होत आहे. याशिवाय मर्दानी खेळ, लेझीम व पारंपरिक बॅँड सहभागी होत आहे.
‘फिरंगाई’चा लेसर शो
फिरंगाई तालीम मंडळ विसर्जन मिरवणुकीत अत्याधुनिक विद्युत रोषणाई व लेसर शोद्वारे लक्ष वेधणार आहे. याशिवाय नियमांत राहून ध्वनियंत्रणेचा वापर केला जाणार आहे. तसेच मुंबईच्या धर्तीवर गणेशमूर्तीभोवती आकर्षक सजावट केली जाणार आहे.
‘लेटेस्ट’चा ‘गंगावतरण’चा चित्ररथ
गंगा नदी ते पंचगंगा नदीमातेची विटंबना थांबण्यासाठी व जनजागृतीसाठी ‘गंगावतरणा’चा लेटेस्ट तरुण मंडळाचा चित्ररथ लक्षवेधी ठरणार आहे. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून नेहमीच या मंडळाकडे पाहिले जाते. चित्ररथात १३ फूट उंच शंकरमूर्ती, नदी व प्रत्येकी सहा फुटांच्या अकरा मूर्ती आहेत. पांढऱ्या रंगाच्या गणवेशातील सुमारे ३६० महिला व पुरुष कार्यकर्ते फेटा बांधून सहभागी होत आहेत. तसेच झांजपथक व धनगरी ढोल, आदी वाद्यांची साथ राहणार आहे.
‘वाघाच्या तालीम’ची दुबई फेस्टिव्हलची विद्युत रोषणाई
उत्तरेश्वर पेठ प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्यावतीने दुबई फेस्टिव्हलसाठी वापरलेली एल ५ ही अत्याधुनिक एलईडी, शार्पी मल्टिकलर, ब्लेंडर, लेसर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ‘सिओटू स्मूकर’ (धूर) व नियमानुसार २ टॉप व २ बेस अशी साऊंड सिस्टीम साऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे.
‘हिंदवी’ची एलईडी स्क्रीन
हिंदवी स्पोर्टसतर्फे मिरवणुकीत पुण्याची अत्याधुनिक विद्युत रोषणाई, १२ बाय २२ फूट एलईडी स्क्रीन, लेझर शो याशिवाय ‘सीओटू’ धूर मशीन्स व पारंपरिक वाद्यांचा सहभाग करून लक्ष वेधले जाणार आहे. नियमांच्या अधीन राहून ध्वनियंत्रणेवर नृत्यासाठी युवकांची ताकद एकवटली जाणार आहे. पडद्यावर आॅलिम्पिक विजेत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.