विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर

By Admin | Published: April 22, 2015 09:48 PM2015-04-22T21:48:46+5:302015-04-23T00:56:23+5:30

संशोधनातील आघाडी वाढविणार : पी. एन. भोसले

Focus on imparting quality education to the students | विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर

विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर

googlenewsNext


अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, दक्षिण कोरिया, आॅस्ट्रेलिया आणि जपानशी असलेले सामंजस्य करार आणि उपयोजित संशोधनात वेगळी ओळख निर्माण करणारा शिवाजी विद्यापीठाचा रसायनशास्त्र विभाग राज्यात पहिल्या आणि देशात पाचव्या क्रमांकावर आहे. स्थापनेची पन्नाशी या विभागाने ओलांडली आहे. या विभागाच्या प्रमुखपदी प्रा. डॉ. पी. एन. भोसले यांची नियुक्ती झाली आहे. संशोधनात विद्यापीठाचा नावलौकिक करणाऱ्या या विभागाची सद्य:स्थिती, भविष्यातील वाटचाल, उपक्रम, योजनांबाबत डॉ. भोसले यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : विभागाची आजपर्यंतची वाटचाल कशी आहे?
उत्तर : रसायनशास्त्र विभागाची सुरुवात १९६४ मध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना झालेल्या हॉटेल ओपलमधून झाली. त्यानंतर सहा वर्षांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हा विभाग पोहोचला. सध्या एम.एस्सी. भाग एक आणि दोनसाठी एकूण २००, तसेच ९० संशोधक विद्यार्थी विभागात शिक्षण घेत आहेत. याठिकाणी आॅर्गयानिक, इनआॅर्गयानिक, अ‍ॅनॅलिटिकल, फिजिकल, इंडस्ट्रियल, अ‍ॅप्लाईड केमिस्ट्री शाखा आहेत. त्यासाठी २१ प्राध्यापक कार्यरत आहेत. यातील प्रत्येकाचे दोन मोठ्या संशोधन प्रकल्पांवर काम सुरू आहे. देशात संशोधनाच्या दृष्टीने विभाग पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षांत संशोधन व विस्तार कार्यांतर्गत विभागाला पाच कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता व दर्जेदार कामगिरीमुळे विद्यापीठाला ‘नॅक’ मानांकन मिळवून देण्यात आमच्या विभागानेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
प्रश्न : विद्यार्थ्यांसाठी विभागातर्फे काय केले जाते?
उत्तर : संशोधन सहायक, डीएसटी-इन्स्पायर, राजीव गांधी फेलोशिप, मौलाना आझाद फेलोशिप, यंग सायंटिस्ट स्कीमअंतर्गत वर्षाकाठी एकत्रितपणे सुमारे दीड कोटीची शिष्यवृत्ती विभागातर्फे विद्यार्थ्यांना दिली जाते. लुपीन फार्मासमवेत विभागाने सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत दरवर्षी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३० हजारांची ‘लुपीन स्कॉलर’ शिष्यवृत्ती दिली जाते. शिवाय त्यांची या कंपनीच्या संशोधन व विकास विभागात नियुक्ती केली जाते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संवाद कौशल्य शिबिर, त्यांनी अध्यापन करावे, यासाठी मार्गदर्शन, करिअर कौन्सिलिंग केले जाते. विविध तज्ज्ञांची चर्चासत्रे, व्याख्यानातून उच्च शिक्षणातील संधी, रोजगार, व्यवसायाची माहिती दिली जाते. दक्षिण कोरियातील चौनम नॅशनल युनिव्हर्सिटी, हनियाँग, सीनकॅन युनिव्हर्सिटी, आॅस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटी, मेलबोर्न युनिव्हर्सिटी, जपानमधील गिपू युनिव्हर्सिटीशी विभागाने सामंजस्य करार केला आहे.
प्रश्न : तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो?
उत्तर : अध्यायन व अध्यापन प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी विभागातर्फे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यात विद्यार्थ्यांच्या विभागांतर्गत आॅनलाईन परीक्षा घेतल्या जातात. काही प्रकल्पांवरील त्यांचे संशोधनविषयक कामकाजाचा अहवाल आॅनलाईन घेण्यात येतो. संशोधन कार्यात त्यांच्या मदतीसाठी अद्ययावत रायटिंग लॅब, कॉम्प्युटर लॅब कार्यान्वित आहे. शिवाय त्यांना केम्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. विभागात दहा कोटींची अद्ययावत यंत्रसामग्री आहे. यात आॅर्गनायझिंग केमिकल अ‍ॅनॅलिसिससाठीचे एनएमआर, एलसीएम, व्हॅक्युम कोटिंग युनिट, टाईम रिझॉल स्पेक्टो फोलिरी मीटर, पार्टिकल साइज अ‍ॅनॅलायझर यांचा समावेश आहे.
प्रश्न : विभागाबाबत भविष्यातील नियोजन काय आहे?
उत्तर : अंतिम वर्षाचा निकाल लागण्यापूर्वी विविध औषधनिर्माण, रसायन कंपन्यांमध्ये ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट विभागातर्फे होते. रसायनशास्त्राशी संबंधित कंपन्या, उद्योगांना कौशल्यपूर्ण व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्याचे ध्येय आहे. प्राध्यापकांनी जास्तीत जास्त दर्जेदार संशोधन प्रकल्पांवर काम करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. विभागातर्फे विद्यार्थी दत्तक योजना राबविली जाते. याअंतर्गत प्रत्येक प्राध्यापक सहा ते सात विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात. त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड अधिक चांगले ठेवून त्यांना स्पर्धेसाठी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने याची व्याप्ती वाढविण्यात येईल. विद्यार्थ्यांना उपकरणांच्या हाताळणीसह त्यांचे संशोधनातील विश्लेषणात्मक कौशल्य वाढविण्यात येईल. विभागाच्या इमारतीने ५० वर्षे पूर्ण केली असून, केमिकल इफेक्टमुळे ती जीर्ण झाली आहे. त्यामुळे १२ कोटींची नवी इमारत येत्या दोन वर्षांत उभारण्यात येणार आहे. संशोधनातील विभागाची आघाडी वाढविण्यासाठी आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
शब्दांकन : संतोष मिठारी

Web Title: Focus on imparting quality education to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.