कोल्हापूर जिल्ह्याचे ‘लक्ष’ आता ‘राजाराम’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:18+5:302021-05-06T04:24:18+5:30
कसबा बावडा : गोकुळमध्ये ३० वर्षांपासून असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार हादरा ...
कसबा बावडा : गोकुळमध्ये ३० वर्षांपासून असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार हादरा देत सत्तांतर केले. त्यामुळे आता महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील ‘राजाराम’ कारखान्यामध्ये काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे ‘लक्ष’ लागून राहिले आहे. गेली २५ वर्षे महादेवराव महाडिक यांच्याकडे राजाराम कारखान्याची सत्ता आहे.
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीला ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक कोरोना आटोक्यात आला तर ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तारूढ व विरोधी गटाची आतापासूनच युद्धपातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
राजारामचे १३४६ सभासद विविध कारणांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी अपात्र ठरविले होते. याबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने एकूण १८९९ हरकती दाखल केल्या होत्या. याबाबत सुनावणी होऊन प्रादेशिक सहसंचालकांनी ४८४ सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे ६९ वगळून अपात्र १००८ व कार्यक्षेत्राबाहेरील ३१८ अशा १३४६ सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरवले होते. नंतर हा निर्णय सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कायम ठेवल्याने सत्तारूढ गटाला हादरा बसला. या निर्णयाविरोधात सत्तारूढ गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल प्रलंबित आहे.
दरम्यान, मागील निवडणुकीत अवघ्या १०० ते २५० मतांनी पराभूत झाल्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. दरम्यान, २०१५ च्या निवडणुकीत आपल्याला कोणत्या गावात मताधिक्य मिळाले व कोणत्या गावात मताधिक्य मिळाले नाही याचा अभ्यास सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून सुरू झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येऊ लागली आहे.
राजाराम कारखान्याच्या यापूर्वी झालेल्या सर्व निवडणुका महादेवराव महाडिक यांनी एकतर्फी जिंकल्या आहेत. मात्र, आता गोकुळमध्येही सत्तांतर केल्याने पालकमंत्री पाटील यांच्या गटाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे राजाराम साखर कारखान्यावरही वर्चस्व मिळविण्यासाठी पाटील गट जोरदार तयारी करण्याची शक्यता आहे.
चौकट : आता ‘राजाराम’ उरलंय...
गोकुळच्या सत्तेला पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुरुंग लावला. त्यानंतर ‘आता फक्त राजाराम उरलंय’ अशी पोस्ट सोशल मीडियावर गोकुळच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे राजाराम कारखान्याची निवडणूक नेमकी कधी होणार आहे हे माहीत नसतानाही ही निवडणूक चर्चेत आली आहे.
चौकट: राजारामचे कार्यक्षेत्र....
राजाराम साखर कारखान्याचे करवीर तालुक्यातील ३०, पन्हाळा तालुक्यातील १८, शाहूवाडी ३६, गगनबावडा १४, हातकलंगडे ३२, राधानगरी १४ व कागल तालुक्यातील ४ अशा एकूण १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे.