Kolhapur: सीमाभागातील तपासणी चौक्यांवर लक्ष केंद्रीत करा, पाच जिल्ह्यातील समन्वय बैठकीत निर्णय
By संदीप आडनाईक | Published: March 5, 2024 07:01 PM2024-03-05T19:01:07+5:302024-03-05T19:02:04+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी घेणार दक्षता
कोल्हापूर : येत्या दोन महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आंतरराज्य तसेच आंतरजिल्ह्यातील सीमा चौक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या समन्वय बैठकीत घेण्यात आला. निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाला दिल्या आहेत.
येथील रेसीडन्सी क्लब येथे झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आढावा घेतला. कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील व लगतच्या इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी दोन्ही राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली.
कोल्हापूरात कर्नाटक, गोवा, सिंधूदुर्ग, सांगली व रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणात विविध साहित्य, वस्तू तसेच औद्योगिक वाहतूक होत असते. यामुळे सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, कायमस्वरुपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्ट उभ्या करा. यासाठी त्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्या. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील विविध चेकपोस्टबाबत माहिती सादर केली. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनीही सादरीकरण केले. बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या आढावा बैठकीत भाग घेतला.
प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले. निवासी उप जिल्हाधिकारी संजय तेली यांनी आभार मानले. बैठकीला सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदिप घुगे उपस्थित होते. याशिवाय बेळगाव, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ऑनलाईन उपस्थित होते. याशिवाय सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, संबंधित पोलिस अधिकारी, अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मालवाहतूक ट्रकच्या हालचालींवर लक्ष
निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेतला. ही वाहतूक रोखण्यासाठी सीमा भागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या समन्वयासाठी व्हॉट्स ॲप ग्रुप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या वाहनांची प्रत्येक ठिकाणी कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.