विद्यार्थीकेंद्रित, गुणवत्तावाढीवर भर देणार
By admin | Published: June 17, 2016 12:19 AM2016-06-17T00:19:07+5:302016-06-17T00:31:30+5:30
वर्षपूर्तीनिमित्त कुलगुरूंची ग्वाही : गतिमान कामकाज करणार, विद्यापीठातील घटकांमुळेच यशस्वी वाटचाल
कोल्हापूर : संशोधन, कौशल्य, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या स्तंभांवर भविष्यातील शिक्षण आणि रोजगार आधारित असणार आहेत. त्यामुळे यावर भर देत विद्यार्थीकेंद्रित आणि गुणवत्तावाढीच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाची वाटचाल राहील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरुपदाच्या वर्षपूर्तीबाबत डॉ. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी शैक्षणिक, संशोधन, केंद्र व राज्य सरकारच्या विविध उपक्रमांतील सहभाग, कौशल्य विकास उपक्रम, सामाजिक बांधीलकी, आदी क्षेत्रांतील वर्षभरातील कामगिरीची माहिती दिली. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, संशोधन, कौशल्य, तंत्रज्ञान व व्यवस्थापन या चार स्तंभांच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून काम सुरू केले. त्या दृष्टीने विद्यापीठात विविध घटकांच्या सहकार्याने उपक्रम राबविले. यात बऱ्यापैकी यशस्वी वाटचाल केली आहे. वर्षभरातील कामगिरीत नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, आॅल इंडिया सर्व्हे आॅन हायर एज्युकेशन, नेचर पब्लिकेशन ग्रुपच्या ई-जर्नल वापराच्या सर्व्हेक्षणात अव्वल स्थानी राहून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाची गुणवत्ता सिद्ध केली व वेगळा ठसा उमटविला. यापुढील वाटचालीत विद्यार्थीविकास हा केंद्रबिंदू मानून तसेच गुणवत्ता वाढीसाठी सर्वसमावेशक आणि गतिमान कामकाजावर भर देणार आहे.
विद्यापीठाच्या घटकांची निष्ठा, जबाबदारीने केलेल्या कामामुळे मला यशस्वी वर्षपूर्तीची वाटचाल करता आली. पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. डी. के. गायकवाड, आर. के. कामत, पी. एन. भोसले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आधी करेन,
मग बोलेन
विनाकारण घोषणा करणे मला आवडत नाही; त्यामुळे आधी काम करीन आणि मगच त्याबाबत बोलेन, अशी माझ्या कामाची पद्धत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या विद्यापीठाचा शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध करण्याच्या जबाबदारीने मी कार्यरत राहीन.